अजित पवारांना कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती, दौरे टाळले

जनदूत टिम    21-Oct-2020
Total Views |
मुंबई : अजित पवारांना कणकण आणि थोडासा ताप असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. सुदैवाने त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अजित पवारांच्या कोरोना चाचणीबाबत उलट-सुलट चर्चा सुरु होती. मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अजित पवार यांनी मेडिकल चेकअप केल्यानंतर आज ते घरीच थांबून विश्रांती घेत आहेत.
 
Ajit Pawar_1  H
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर जावून, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. आजही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात उस्मानाबादमध्ये पाहणी करत आहेत.
 
त्याआधी अजित पवारांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पुरामुळे बाधित झालेले रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. सध्या अजित पवार हे घरीच असून, विश्रांती घेत आहेत.
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी बारामतीत जाऊन, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी नद्यांसह ओढ्याभोवतीची अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. अजित पवार म्हणाले, “नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं तातडीने हटवा. माझं- अजित पवारांचे अतिक्रमण असेल तरी मुलाहिजा बाळगू नका”.