समृद्धी महामार्गात कोट्यावधी रुपयांचा भूखंड घोटाळा!

जनदूत टिम    20-Oct-2020
Total Views |

कसारा पोलीस ठाण्यात जमीन गैरव्यवहारा प्रकरणी भा द वी ४२० चा गुन्हा दाखल
कल्याण सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत, सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर घेतला आक्षेप

शहापूर : महाराष्ट्र शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गामधल्या रस्ते भूसंपादनात मोठ्या प्रमाणात भूमाफिया गोंधळ घालत असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे . असे असताना शहापूर तालुक्यातील कसारा परिसरातील वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत कसारा पोलिसांनी वाशाळा गावातील प्रवीण गोविंद धसाडे व ईतर ६ जणांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केल्याने तालुक्यातील ईतर भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.
 
Samruddhi-Mahamarg_1 
 
वाशाळा गावात राहणारे मारुती नारायण धसाडे यांची वडिलोपार्जित शेतजमीन गावालगत होती . मौजे वाशाळा येथील सर्वे नंबर ३७६ मध्ये तब्बल ८४ एकर शेतजमिनी संदर्भात मारुती धसाडे व प्रवीण गोविंद धसाडे यांच्यात अनेक वर्षांपासून शहापूर येथील दिवाणी न्यायालयात जमीन वाटपासंदर्भात दावा सुरु होता . याच काळात २०१७ साली मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गात या ८४ एकर जमिनीपैकी ११ ते १२ एकर शेतजमीन थेट खरेदीने रस्ते कामासाठी घेण्याचे भूसंपादन अधिकाऱ्यांकडून समजल्यावर प्रवीण गोविंद धसाडे न्यायालयाच्या निर्णयाची वाट न बघता घाईघाईत ही जमीन थेट खरेदीखताद्वारे समृद्धी महामार्ग प्रशासनाला विक्री करित तब्बल तीन कोटी चौपन्न लाख एकष्ठ हजार पाचशे त्रेचाळीस रुपये आपल्या बँक खात्यात घेत मारुती धसाडे यांची फसवणूक केली . मारुती धसाडे यांना झालेला प्रकार समजताच त्यांनी विविध महसूल दप्तरी आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आला.
 
अखेर मारुती धसाडे यांनी कसारा पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार सांगताच पोलिसांनी तात्काळ प्रवीण गोविंद धसाडे यांच्यासह ईतर सहा जणांविरोधात पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करित त्यांच्यावर भा द वी ४२० , ४२३,१८१,४६५,४६७,४६८,४७१,३४ प्रमाणे गुन्हा नोंद केला . तसेच संशयित आरोपी प्रवीण धसाडे यांच्या बँक खात्यासह ईतर संशयित आरोपींच्या बँक खात्यातील एकोणीस लाख अडसष्ट हजार रुपये गोठवून ठेवण्याचे आदेश पोलिसांनी बँक व्यवस्थापकांना दिले . कल्याण सत्र न्यायालयाने देखील या गंभीर गुन्ह्याची दखल घेत संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारत , पोलिसांनी यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवल्याने महसूल विभागात देखील खळबळ उडाली असून या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास शहापूर पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे, कसारा पोलीस निरीक्षक दत्तू भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केशव केंद्रे हे करित आहे.