नलाईन राज्यस्तरीय स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेत सुनील म्हसकर सर प्रथम स्थानी

जनदूत टिम    19-Oct-2020
Total Views |
शहापूर : शहापूर तालुक्यातील किल्ले माहुलीच्या कुशीत वासिंद बाजारपेठे जवळ वसलेले मौजे पाली या छोट्याशा गावचे लाडके सुपुत्र आणि भारत सरकारने ठाणे जिल्हा आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित केलेले ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत व प्रतिभावंत शिक्षक कवी सुनील म्हसकर सर ! सध्या ते ठाणे येथील श्रीरंग एज्युकेशन सोसायटीच्या श्रीरंग विद्यालय मराठी माध्यमिक विभागात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

sprdha_1  H x W 
 
त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.शाखा उल्हासनगर द्वारा आयोजित ऑनलाईन "स्वरचित कविता सादरीकरण २०२०" या स्पर्धेत भाग घेतला होता! त्यांनी स्वतः रचलेली व स्वतः चालबद्ध केलेली श्रावणधारा ही कविता अतिशय उत्तमपणे सादर केली होती! त्यांच्या या कवितेस राज्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे! या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नागपूर यांसह अनेक जिल्ह्यातील अनेक नामवंत कवींनी सहभाग घेतला होता! एका छोट्याशा खेडे गावातील सुनील म्हसकर सर यांनी मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे! या आधी म्हसकर सर यांस त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबाबत स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 
सुनील म्हसकर सर हे एक निष्ठावंत हाडाचे शिक्षक असून त्यांस वाचन, लेखन, वक्तृत्व, नाट्य, गायन, सूत्रसंचालन, बागकाम, मार्गदर्शन, समाजसेवा आणि अध्यापन आदी विषयांची विशेष आवड आहे! ते एक तंत्रस्नेही शिक्षक आहेत! साहित्य क्षेत्रात त्यांनी आजतागायत कविता, कथा, पोवाडा, पथनाट्य, नाटिका, लेख, निबंध आदी विविध प्रकारचे लेखन केले आहे! बिर्ला महाविद्यालयात असताना त्यांच्या 'फसवणूक' या कथेस राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे! तसेच त्यांच्या विविध कवितांनाही अनेक वेळा पुरस्कार मिळालेले आहेत.
 
त्यांनी पाली गावाचेच नव्हे तर ठाणे जिल्हयाचे नाव रोशन केले आहे! राज्यस्तरीय स्वरचित कविता सादरीकरण स्पर्धेत जो प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्याबाबत त्यांचे पाली या ग्रामस्थांकडून, त्यांच्या विद्यालयाकडून आणि एवढेच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे! अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या सुनील म्हसकर सर यांची उत्तमोत्तम प्रगती व्हावी, ही सदिच्छा!