मिठी नदी विकास प्रकल्पासह विविध कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

19 Oct 2020 18:49:43
मुंबई : मिठी नदी विकास प्रकल्प, माहिम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता यांसह इतर विविध विकासकामांसंदर्भात आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन आढावा घेतला.
 
Min Aditya Thackeray Meet
 
एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, संजिव जयस्वाल, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मिठी नदीचे पुनरुज्जीवन करणे तसेच नदीचा शाश्वत विकास करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. नदीच्या सभोवताली वॉकवे तयार करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
 
याची सुसाध्यता (feasibility) बघून माहिती सादर करावी, अशा सूचना पालकमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. याबरोबरच सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानच्या लिंकरोडच्या कामासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. माहिम कॉजवे जोड रस्त्याच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शहरातील कांदळवनांचे चांगल्या पद्धतीने जतन – संवर्धन व्हावे यासाठी त्यांचे वन विभागाला हस्तांतरण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
 
‘एमएमआरडीए’मार्फत राबविण्यात येत असलेल्या इतर प्रकल्पांचीही यावेळी माहिती घेण्यात आली. लवकरच पुन्हा बैठक घेऊन सर्व कामांना गती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. एमएमआरडीए, महापालिका आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन प्रलंबित कामे गतिमान करावीत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
Powered By Sangraha 9.0