दुकानं-हॉटेल्सच्या वेळेत वाढ

जनदूत टिम    16-Oct-2020
Total Views |
मुंबई : संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिलेल्या दुकानांची वेळ अडीच तासांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे दुकानांसह व्यापारी आस्थापने ही रात्री साडे नऊ वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेले हॉटेल व फूड कोर्टसह रेस्टॉरंट आणि बारही रात्री साडे अकरापर्यंत खुली ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे.
 
2restaurant_0_1 &nbs
 
महापलिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सध्या भाजी मार्केटसह दुकानं आणि आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी आहे. परंतु दुकानं, व्यापारी आस्थापने खुली ठेवण्याची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. या मागणीचा विचार करत महापलिका आयुक्तांनी ही वेळ वाढवून रात्री साडे नऊ वाजेपर्यंत वाढवून देण्यास परवानगी दिली आहे.
 
दरम्यान, ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार यांना एकूण क्षमतेच्या ३३ टक्के सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ते सकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. खरंतर राज्यात नोव्हेंबरपर्यंत पूर्ण अनलॉक होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसं सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. पण कोरोना वाढता धोका पाहता राज्य अनलॉक करता येणार नाही असं राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.
 
राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. अशातच ‘कोरोनाचा संसर्ग वाढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वयंशिस्त पाळलीच पाहीजे. अन्यथा अनलॉकचा विचार आपल्याला सोडून द्यावा लागेल’, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला होता. नागरिकांनी शिस्त पाळली नाही, मास्क वापरले नाही, सोशल डिस्टंसिंग न पाळता संसर्ग पसरत राहिला, तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाईल. म्हणजेच कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण पुन्हा वाढेल. त्यामुळे स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. त्या अनुषंगानेच सगळ्या गोटी अवलंबून आहेत.
 
नागरिकांकडून वेगवेगळ्या मागण्या होत आहेत. त्यावर आमचं विचारमंथन चालू असतं, पण शिस्त पाळली आणि कोरोनाग्रस्तांचा आकडा मर्यादित राहिला तरच नागरिकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने विचार करता येईल. असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.