ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने हात धुवा दिवस साजरा

जनदूत टिम    16-Oct-2020
Total Views |

ग्रामपंचायतस्तरावर हात धुण्याचे दिले प्रात्यक्षिक

ठाणे : आरोग्याच्या दृष्टीने आणि आता कोरोना काळात वेळोवेळी हात स्वच्छ धुणे अत्यंत महत्वाचे असून गुरुवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात ''हात धुवा दिवस '' अर्थात वर्ल्ड हँडवॉश डे साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांना हात कसे धुवावे याचे शास्त्रयोक्त पद्धतीने प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले. तसेच स्वच्छतेची शपथ देण्यात आली. ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता) छायादेवी शिसोदे याच्या नियंत्रणाखाली ठाणे जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

Bhiwandi_1  H x 
 
रोजच्या दैनंदिन जीवनात स्वच्छ हात धुणे ही क्रिया आजार होण्यापासून रोखत असते. नागरिकांना हात धुण्याचे महत्व पटावे यासाठी जागतिक स्तरावर १५ ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड हँडवॉश डे म्हणून 'साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेने ४३१ ग्रामपंचायत स्तरावर हात धुण्याचे प्रात्याक्षिक कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये गावातील लोकप्रतिनिधी, नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला व बाल विकास विभागाच्या अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्त्या यांनी प्रत्येक्ष सहभाग घेतला. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थाना ऑनलाईन पद्धतीने हात कसे धुवावे याचे धडे शिक्षकांनी दिले. हा दिवस यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट समन्वयन, समूह समन्वयक, व जिल्हा स्तरावरील स्वच्छ भारत मिशनचे सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. अशी माहिती समाजशास्त्रज्ञ दत्तात्रय सोळंके यांनी दिली.