हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाने वाजविला डफडा

जनदूत टिम    15-Oct-2020
Total Views |
ठाणे : भटक्या-विमुक्तांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सरकार दरबारी अनेक सातत्याने पाठपुरावा करुनही अद्यापही बंजारा आरक्षण किंवा क्रिमीलेयर, बढतीमधील आरक्षण,तांडा सुधार असे प्रश्न सोडविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ओबीसी, भटकेविमुक्त नेते मा. खा. हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडा बजाओ आंदोलन करण्यात आले.
 
Banjara_1  H x
 
बंजारा आरक्षण किंवा क्रिमीलेयर, बढतीमधील आरक्षण,तांडा सुधार प्रश्नावर गोराबंजारा समाज गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. मात्र, या संघर्षाची दखल घेतली जात नसल्यानेच गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बंजारा समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मा. खा. हरिभाऊ राठोड म्हणाले की, ऑल इंडिया बंजारा संघ, राष्ट्रीय भटके विमुक्त मागासवर्गीय महासंघाच्या वतीने हे आंदोलन सबंध महाराष्ट्रात करण्यात आले आहे. क्रिमेलियरमधून बंजारा आणि भटके विमुक्त समाजाला वगळले पाहिजे, ही आमची मागणी आहे.
 
वास्तविक ही बाब कायदेशीर आहे. पण, मंत्रालयात मुर्ख अधिकारी बसले आहेत. त्यांना काहीही कळत नाही. त्यामुळेच बढत्यांमधील मागासवर्गीयांचे आरक्षण थांबलेले आहे. ते सुरु करावे. केंद्रामध्ये जसे धनगर समाज एसटीचे आरक्षण मागत आहे. तसेच, आरक्षण आम्हाला देण्यात यावे. त्यासाठी एसटीमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवून आम्हाला देण्यात यावे. धनगर समाजालाही आरक्षण देण्यात यावे.
 
या आंदोलनात भटके विमुक्त मागासवर्गीय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अप्पासाहेब भालेराव, मुंबई अध्यक्ष अमीत साळुंखे, ठाणे अध्यक्ष रामदास राठोड, जनाबेन राठोड, मिना राठोड, मिना राठोड, लाला चव्हाण, रवी राठोड, रमेश राठोड, हरी चव्हाण, लक्ष्मण राठोड, पुरीण राठोड, सुंदर भाईं अशोक पवार, शंकर राठोड, गोपाळ पवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 
एका महिन्यात मिळणार मराठ्यांना आरक्षण
मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील झाला होता. मात्र, आता तो सुटत आलेला आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात तिन्ही राजे, शरद पवार, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, विविध संघटना यांच्याशी सल्लामसलत करुन एकमत झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. तुम्हाला मी विश्वासाने सांगतो की, एक महिन्याच्या आत हा प्रश्न सुटणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत आमचा अभ्यास नाही, असे विधान केले आहे. पण, त्यांना आम्ही हे सांगतो की तुम्ही जरी लॉयर असलात तरी आम्ही लॉ मेकर आहोत. त्यामुळे आम्हाला शिकवू नका.