राज ठाकरेंना भेटताच ग्रंथालये सुरु

जनदूत टिम    15-Oct-2020
Total Views |
मुंबई : राज्यातील ग्रंथालय सुरु व्हावीत या मागणीसाठी ग्रंथालय प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. यानंतर राज ठाकरेंनी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन करत ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या होत्या. यानंतर अवघ्या 7 दिवसात राज्य सरकारने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतला.
 
books_1  H x W:
 
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ग्रंथालय पुन्हा सुरु करा, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सरकारने ही परवानगी दिली नव्हती. मात्र राज्य सरकारकडून मिशन बिगीन अंतर्गत काल (14 ऑक्टोबर) नवी नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार राज्यभरातील ग्रंथालय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे नियम पाळूनच ग्रंथालय सुरु करता येणार आहेत, असेही यात नमूद केले आहे.
 
दरम्यान राज्यातील ग्रंथालय प्रतिनिधींनी गुरुवारी (8 ऑक्टोबर) राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, अशी मागणी राज यांच्याकडे केली. पुस्तकं ही सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात त्याची फार आवश्यकता आहे. म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये बंद केलेली ग्रंथालये पुन्हा सुरु करण्यात यावीत. त्यामुळे वाचन चळवळ वृद्धिंगत होईल. त्यावर अवलंबून असलेल्या अर्थचक्रालाही गती मिळेल, असे मत ग्रथांलय प्रतिनिधींनी राज ठाकरेंसमोर मांडलं होतं.
 
त्यानंतर त्यांनी तात्काळ उदय सामंत यांना फोन करत ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या. उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या विनंतीला मान देत, शक्य तितक्या लवकर ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन त्यांना दिलं.
मात्र उदय सामंतांनी ग्रंथालय सुरु करण्यासाठी कोणी कोणाला फोनाफोनी केली म्हणून ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला होता.