‘स्वराज से बढकर क्या?’; ‘तान्हाजी’च्या रुपातील अजय देवगणचा लूक प्रदर्शित

जनदूत टिम    12-Nov-2019
Total Views |
ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील अभिनेता अजय देवगणचा लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अजय तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी सिंहासारखे लढणारे तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर हा चित्रपट आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नरवीर तानाजी मालुसरे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील तान्हाजी मालुसरे हे अत्यंत पराक्रमी आणि विश्वासू साथीदार होते.


 
हाती तलवार घेऊन भेदक नजरेनं पाहणाऱ्या अजयच्या या पोस्टरवर ‘स्वराज से बढकर क्या?’ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘तान्हाजी’ठेवण्याच्या मुद्दय़ावरून चित्रपटकर्त्यांवर समाजमाध्यमातून टीका होत होती. संख्याशास्त्रानुसार हा बदल करण्यात आल्याचा आरोप होत होता. मात्र, मालुसरे यांच्या वंशजांपासून ते काही इतिहास अभ्यासकांनी मूळ नाव ‘तान्हाजी’ असल्याकडे लक्ष वेधले आहे. आणि म्हणूनच नावात बदल करण्यात आला असल्याचे चित्रपटकर्त्यांनी स्पष्ट केले.