मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही.

आंदोलन कर्त्यांवर बळाचा वापर मुंबईवरून सूचनेनंतर पोलिसांची लाठी चार्ज...

जनदूत टिम    04-Sep-2023
Total Views |
  • सत्तेचा गैरवापर करण्यात आलेला आहे
  • संबंध नसलेल्या लोकांवरही लाठी चार्ज
  • आत्ताच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी ओळखावी

मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही 
Mumbai :
काल झालेल्या जालन्यातील घटनेवर आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब म्हणाले की ,शिंदे सरकारने शब्द पाळला नाही त्यामुळे आंदोलन सुरु झालं. मात्र आंदोलन कर्त्यांवर बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी हवेत गोळीबार करुन आंदोलकांना हुसकावून लावलं. मोठ्या संख्येने पोलीस आंदोलनस्थळी आले. एका बाजूने चर्चा सुरु ठेवली तर दुसऱ्या बाजूने लाठीहल्ला केला. आंदोलकांना माझा सल्ला आहे की त्यांनी शांततेत आंदोलन सुरु ठेवावं कारण हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. 
 
जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी घटना घडलेल्या अंतरवली सरावटी या गावी जात आंदोलकांची भेट घेतली. या अगोदर शरद पवार साहेब यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मराठा आंदोलकांसंदर्भा घडलेला प्रकार हा गंभीर असून जखमींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना मुंबईवरून फोन आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याची आंदोलकांनी मला सांगितले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी स्पष्ट केले आहे.
 
शरद पवार साहेब पुढे बोलताना म्हणाले की, घडलेले प्रकार हा गंभीर आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यापूरता मर्यादीत राहणार नाही. म्हणून मी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घटनास्थळी येण्याचा निर्णय घेतला. संकटात असलेल्यांना दिलासा देण्याची गरज असते. खरं सांगायचं म्हणजे मराठवाड्यात मोठा दौरा आयोजित करण्याच्या प्रयत्नात होतो. दुष्काळाची स्थिती पाहायची होती. जलाशयामधील पाणीसाठा अपुरा आहे. पुढील संकटे येणार आहे म्हणून दौरा आयोजित करणार होतो. मात्र ही घटना अचानक घडली. आज आम्ही तिघांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. आश्चर्य वाटेल अशा प्रकारचा बळाचा वापर करण्यात आला आहे. लहान मुले, वडीलधाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. जखमी आंदोलनकर्त्यांनी माहिती दिली की आमची चर्चा सुरू होती अधिकारी बोलत होते मार्ग निघेल असे दिसत होते. मात्र जास्तीचे पोलीस तिथे बोलावण्यात आले. सर्व व्यवस्थित सुरू असताना मुंबईवरून सूचना आल्या आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दृष्टीकोण बदलला म्हणून त्यांनी बळाचा वापर सुरू केला. हवेमध्ये गोळीबार केला. लहान छऱ्यांचा वापर करण्यात आल्याचीही माहिती जखमींनी दिली असे शरद पवार साहेब यांनी सांगितले आहे.
 
शरद पवार साहेब पुढे म्हणाले की, प्रत्यक्ष सराटीला गेलो तिथे तरुण होते, जालना आणि जालन्याबाहेर होते. तर आमचे म्हणजेच कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार जेंव्हा होते तेव्हा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी यासाठी काहीच केले नाही. तर आंदोलनकर्त्यांना सांगितले की तुमच्या आंदोलनाप्रती आस्था आहे. आंदोलन शांततेत सुरू ठेवा जर चर्चेतून तोडगा निघाला तर काढा मात्र जाळपोळ करू नका यामुळे आंदोलकांची बदनामी होते.
 
पुढे बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, चर्चा सुरू असताना असा बळाचा गैरवापर करणे चुकीचे आहे. स्त्री-पुरुष बघितले नाही तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावे यातून मार्ग काढावा तर आम्ही मराठा आरक्षणाचा विषय इंडिया आघाडीच्या बैठकीतही चर्चीला गेल्याचे त्यांनी सांगितले आणि जातीनिहाय जनगणना व्हावी याबाबतही चर्चा करण्यात आली असल्याची माहिती शरद पवार साहेब यांनी दिली.
 
सर्व व्यवस्थीत सुरू असताना फोन आल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती जखमींनी दिली असे म्हणत शरद पवार साहेब म्हणाले की आशिया खंडातील सर्व देशाचे लक्ष इंडिया आघाडीच्या बैठकीकडे होते. सर्व नेते बैठकीला हजर होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा उद्योग केला की काय अशी शंका आहे असे देखील यावेळी शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.
 
काल बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला होता की, गोवारी हत्याकांडावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. मग त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा का दिला नाही. तर यावर बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, 1994 म्हणजेच 28 ते 30 वर्षापूर्वी गोवारींचे प्रकरण झाले तेव्हा मी मुख्यमंत्री होतो पण नागपुरात नव्हतो. मी मुंबईत होतो. तेव्हा आदिवासी कल्याण मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी असे केले होते. आता कोण जबाबादारी घेतोय त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी मुंबईतील घटनेनंतर तेव्हाचे गृहमंत्री यांनी राजीनामा दिला होता असेही शरद पवार साहेब यांनी यावेळी सांगितले आहे