मोदी सरकार विरुद्ध इंडिया महाआघाडीची कामे जोमत...

जनदूत टिम    02-Sep-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai : 
मुंबई -शुक्रवार-केंद्रातील, हुकूमशाही वृत्तीचे, अहंकारी, भ्रष्टाचाराने व्यापलेले,निवडक लोकांच्या हितासाठी चालवलेले, अल्पसंख्य आणि माध्यमांना भयभीत करणारे, महागाई, बेरोजगारी वाढविणारे, सरकार एकजुटीने घालवून देश भयमुक्त कारभार देण्याची ग्वाही देत आज इंडिया महाआघाडीच्या दोन दिवसीय तिस-या बैठकीची सांगता झाली.हम रुकेंगे नहीं, डरेंगे नहीं, जुटेंगे लडेंगे और जीतेंगे, असा संकल्प देशातील २८ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज येथे जाहीर केला.

मोदी सरकार विरुद्ध इंडिया महाआघाडीची कामे जोमत
 
मुंबईतील वाकोला नजिक हॉटेल ग्रॅन्ड हयात येथे इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांची ही तिसरी बैठक राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या समारोप पत्रकार परिषदेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, लालूप्रसाद यादव, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, सीताराम येच्युरी, अखिलेश यादव, तामिळनाडू मुख्यमंत्री स्टालिन, नीतीश कुमार, मेहबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला आदी उपस्थित होते.
 
उद्धव ठाकरे यांनी ही लढाई अत्याचार विरोधातील सर्व नागरिकांची असल्याचे सांगून भयमुक्त भारत करण्यासाठी ही एकजूट असल्याचे स्पष्ट केले.कॉंग्रेस अध्यक्ष खरगे यांनी मोदींची नीती गरिबविरोधी असल्याचा आरोप केला.संसदेचे विशेष अधिवेशन कधी त्यांनी कोरोना,नोटबंदी, मणिपूर दंगली, चीनची घुसखोरी यासाठी बोलाविले नाही, खोटं बोल रेटून बोल अशी ही नीती आहे पण आम्ही त्यांना उघडे पाडू असेही ते म्हणाले.
 
बिहार मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी निवडणुका नियोजित वेळेपूर्वी होऊ शकतात याकडे लक्ष वेधून वेगाने काम करण्याची आवश्यकता आहे असे सांगून, मिडिया सुद्धा भयमुक्त करू अशी ग्वाही दिली.तामिळनाडू मुख्यमंत्री स्टालिन यांनी आम्ही सत्तेसाठी नाही तर जनतेला सुरक्षित जीवन देण्यासाठी एकत्र आलो हे स्पष्ट करीत भाजपचे काउन्ट डाऊन सुरू होत आहे असे ठामपणे सांगितले.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आजवरचे सर्वात भ्रष्ट, अहंकारी सरकार अशी मोदी सरकारची संभावना करत इंडिया एकजूट फोडण्यासाठी मोठ्या शक्ती सक्रिय झाल्या आहेत मात्र ही आघाडी फुटणार नाही असा विश्वास व्यक्त केला.राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी मोदींना हरवू,देश वाचवू असे जाहीर करत जागावाटप वरून मतभेद होणार नाही असा विश्वास आपण राहुल गांधी यांना देतो असे स्पष्ट केले.माकप नेते सीताराम येच्युरी यांनी संविधान वाचविण्यासाठी ही लढाई आहे,सुरक्षित इंडिया साठी सर्व सेक्युलर विचार एकत्र आले याविषयी समाधान व्यक्त केले.
 
साठ टक्के जनता सोबत-राहुल गांधी
कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, देशाच्या १४०कोटींपैकी साठ टक्के जनता इंडिया आघाडी सोबत असल्याने आता भाजपचा पराभव निश्चित आहे.मोदी आणि ठराविक उद्योगपती यांचे संगनमत आहे एक बिलीयन डॉलर इतकी देशाची संपत्ती बाहेर गेली याची चौकशी व्हायला हवी.लडाखमधील पेन्गॉंग विभागातील भूभाग चीनने बळकावला आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.सत्तेवर येताच आमचे व्हिजन दाखवून देऊ. मुंबई बैठकीचे उत्कृष्ट नियोजन केले त्याबद्दल राहुल गांधी यांनी समाधान व्यक्त केले.
 
स्वच्छ प्रशासन देऊ-शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी इंडिया आघाडीवर भाजपकडून टीका सुरू झाली याकडे लक्ष वेधताना खरे घमंडिया तेच आहेत असा टोला लगावला.जे चुकीच्या मार्गाने गेले, आणि योग्य मार्गावर येणार नाहीत त्यांना दूर करू स्वच्छ प्रशासन देऊ अशी ग्वाही यावेळी दिली.
 
या पत्रकार परिषदेचे संयोजक शिवसेना नेते प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रश्नोत्तरे होणार नाहीत असे जाहीर केले. तेव्हा उपस्थित पत्रकारांत नाराजी पसरली.प्रश्न विचारू दिले नाहीत याबद्दल नंतर चर्चा होत राहिली.