वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या'स्वाधार' साठी १०५ कोटी रुपयांचा निधी वितरीत...

"स्वाधार" योजनेंतर्गत १०५ कोटी रुपयांचा निधी वितरीत.....

जनदूत टिम    23-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai:
 
सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांपैकी अकरावी व बारावी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविधस्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १०५ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिली आहे.
 
मागासवर्गीय मुला- मुलींना उच्च शिक्षण घेणे सुकर व्हावे म्हणून राज्यात मागासवर्गीय मुला- मुलींसाठी शासकीय वसतिगृहाची योजना राबविण्यात येते. राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहे (मुलांसाठी २२९, मुलींसाठी २१२) सुरू असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य आदी सुविधा पुरविण्यात येतात. स्वाधार योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये, इतर महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५१ हजार रुपये व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये एवढी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
 
या योजनेंतर्गत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षासाठी या योजनेंतर्गत १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामधून आतापर्यंत १०५ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. हा निधी अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न खात्यात जमा करण्यात आला आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी कळविले आहे.