कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये दरम्यान आदिवासी महिला रुग्णांकडून आकारली जात आहे फी...

जनदूत टिम    23-Aug-2023
Total Views |
"कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया"
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये दरम्यान आमच्या गरीब आदिवासी महिला रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण रुग्णालय कशेळे,ता.कर्जत,जि.रायगड कडून तीन ते चार हजार रुपये फी म्हणून वसूल करण्यात येत होते. याबाबत काही महिला रुग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत मला दोन तीन महिन्यापासून कॉल करून तक्रार करत होते.त्यामुळे काही कार्यकर्त्यांसोबत सदर रुग्णालय गाठले.सदर रुग्णालयामार्फत आमच्या आदिवासी बहुल भागामध्ये चांगल्याप्रकारे सेवा देण्याचे काम चालू जरी असले तरी,हा जो काही आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रकार आहे खूपच लाजिरवाणा होता.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये दरम्यान आदिवासी महिला रुग्णांकडून आकारली जात आहे फी 
याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना भेटून या बाबत जाब विचारला गेला.त्यांना भेटण्यापूर्वी ज्या महिला रुग्णांकडून या पूर्वी पैसे वसूल करण्यात आले होते त्यांचे व्हिडिओ स्टेटमेंट घेतले.त्यात काही महिलांनी सांगितले की आमच्या गावातील दहा महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी निघाल्या होत्या,परंतु तीन-चार हजार रुपये भरावे लागतील,त्यात प्रवास खर्च व इतर खर्च करावा लागणार असल्यामुळे दहा महिलांऐवजी आम्ही दोनच महिला सदर शस्त्रक्रिया करण्यासाठी आल्या आहोत ! ही एका आदिवासी वाडीतील हकीगत झाली;अशा सगळ्याच वाड्या,वस्त्यांमध्ये परिस्थिती आहे.सध्या भारत सरकार लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी विविध नियमावली,कायदे,परिपत्रके,जनजागृती,तर रुग्णांना प्रोत्साहन भत्ता देवून कुटुंब नियोजन करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करीत आहेत.असे असताना सदर रुग्णालयाकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिययेसाठी तीन ते चार हजार रुपयांची मागणी केली जात होती.
 
सदर बाब ही आरोग्याची देवता धन्वंतरी यांनाही लाज वाटावी अशा स्वरूपाची वर्तणूक आहे.यापूर्वी ज्या महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत,त्यांच्याकडूनही सदर रुग्णालययाने अशा स्वरूपाच्या बेनामी रक्कमा स्विकारल्या होत्या.परंतु सदर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना भेटून ते करत असलेल्या चुका यांची जाणिव करून दिली.त्यांनीही तसे कबूल करून अशा चुका पुन्हा कधीच होणार नाहीत असे आश्वासन दिले.तसेच कविता निरगुडे/हंबीर मॅडम आपल्यासह आपल्या सहकाऱ्यानी आमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे ! असे बोलून दाखवले.या पूर्वीपासून अशा स्वरूपाचा चुकीचा पायंडा होता!
 
आम्ही अनवधानाने तो पुढे चालविला ही आमची चूक झाली !परंतु आजपासून येथे असे काहीही घडणार नाही.तसेच आज दिनांक.२१/०८/२०२३ रोजी आम्ही सगळ्या महिला रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता तुमच्या समक्ष त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडत आहोत ! त्यांना वेळोवेळी तपासणी करून सर्व रुग्णांना नाश्ता वैगरे आमच्याकडुन देण्यात आला आहे!असे सांगितले.यापुढे आम्ही सर्व रुग्णांची चांगल्याप्रकारे सेवा करू ! यापुढे अशा स्वरुपाची कोणतीही तक्रार आपल्याकडे येणार नाही,असे आश्वासनही वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत देण्यात आले आहे.सदर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी आमच्याशी खूप चांगल्याप्रकारे चर्चा करून आमच्या मागण्यांची पूर्तता केली आहे.यासाठी आमचे सहकारी आदि.चेतन बांगारे(ठाणे जिल्हा अध्यक्ष)आदि.चिंतामण जावळे,आदि.अनंता हंबीर,आदि.भगवान ठोंबरे,आदि.गजानन खंडवी,आदि.अरुण बांगारे,आदि.नमिता निरगुडा,आदि सहकाऱ्यांनी रेकी करण्यास उपस्थितीत राहून सहकार्य केले.
  
"तरी भविष्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालय काय,इतर कोणतेही शासकीय रुग्णालय बेनामी फी मागत असल्यास,माझ्याशी,माझ्या सहकाऱ्यांशी नक्की संपर्क साधा."
.......
आदि.कविता निरगुडे/हंबीर
(आदिवासी महिला समाजसेविका)(आदिवासी माझा)