" पिझ्झा आणि बर्गर पासून सावधान..."

जनदूत टिम    23-Aug-2023
Total Views |
वाचक हो,
नुकत्याच संसदेच्या अधिवेशनात आपल्या आरोग्यमंत्र्यांनी पिझ्झा आणि बर्गर यासंबंधीच्या सादर केलेल्या एका अहवालात आपल्या देशात दरवर्षी पिझ्झा आणि बर्गर च्या अतिसेवनामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांमुळे सुमारे पाच लाख 50 हजार मृत्यू होतात असे नमूद केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

पिझ्झा आणि बर्गर पासून सावधान 
हे वृत्त अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक बनले आहे. कारण अगदी लहान मुलांपासून ते तरुण आणि प्रौढांपर्यंत या पिझ्झा आणि बर्गर ची चटक आपल्याकडे लागलेली दिसते आहे. त्यासाठी शेकडो रुपये खर्च करून याचे सेवन करण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. मुळात यामध्ये मेदाचे म्हणजेच ट्रान्स फॅटी ऍसिड प्रमाण बरेच जास्त असते आणि अशा मेदामलांमुळे आपल्या शरीराची हानी होते, आरोग्याचे नुकसान होते, शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते. परिणामी रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका संभवतो. इतके माहीत असून देखील पिझ्झा आणि बर्गर खाण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली दिसून येते. याला काय म्हणावे आपल्या आरोग्याबद्दल असलेले प्रचंड अज्ञान याला कारणीभूत आहे का? असा विचार निश्चितपणे मनात डोकावतो.
 
लहान मुलांपासूनच आरोग्याबद्दलचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. आपल्या देशात विविध राज्यांमध्ये विविध आहाराच्या पद्धती आहेत. त्या त्या राज्यातील आहार पद्धती या त्या राज्यातील वातावरणाला पोषक अशा पद्धतीने परंपरेने चालत आलेल्या आहेत. म्हणजे कर्नाटक, आंध्र अशा दक्षिणेकडच्या राज्यात इडली-सांबार, डोसा हे पदार्थ सहज पचतात तर उत्तरेकडे म्हणजे पंजाब, दिल्ली, हरियाणा या ठिकाणी गव्हाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर केले जातात आणि पचतात देखील. अशा पारंपारिक पद्धतीने चालत आलेल्या आहाराला बगल देऊन चीन किंवा पाश्चात्य देशातून आयात केलेल्या पिझ्झा बर्गर या पदार्थांची मागणी आपण भारतीय अधिक प्रमाणात करत बसलो तर आपल्या आरोग्याचे नुकसान निश्चितपणे होणार आहे आणि ते होत असल्याचे वरील अहवालावरून निश्चित झाले आहे.
 
हा अहवाल अतिशय गांभीर्यपूर्वक सर्वांनीच घ्यायला हवा आणि पिझ्झा आणि बर्गर पासून आपल्याला दूर कसे राहता येईल याचा विचार करायला हवा त्यासाठी या आहार्य पदार्थांच्या जाहिरातींवर खरे तर बंदी आणणे हे आवश्यक आहे. यावरील वेष्ठनावर आरोग्याला ते कसे घातक ठरू शकते असा धोक्याचा इशारा देखील छापणे आवश्यक बनले आहे. अर्थात केवळ धोक्याचा इशारा छापून हे भागणार नाही तर अशा प्रकारच्या धोकादायक आहार्य पदार्थांचे अतिसेवन करण्यापासून सर्वांनाच परावृत्त करणे हे गरजेचे आहे.त्यासाठी भारतीय आहार शास्त्रातील चविष्ट पदार्थांची रेलचेल कशी वाढेल आणि त्यांचा प्रचार कसा होईल याकडेही लक्ष देणे ही खरी काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वच आहार तज्ञांनी, डॉक्टरांनी, शिक्षकांनी, प्राध्यापकांनी आणि लोकप्रतिनिधींनी झटायला हवे. आरोग्य प्रबोधनाची चळवळ यामधून उभारणे हे गरजेचे आहे. तसे केले तरच आपण अशा प्रकारच्या मृत्यूपासून दूर राहू शकू... असो.
 
वैद्य.विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक, नाशिक...
मोबाईल ९८२२०७५०२१