तारापूर एमआयडीसीतील साडेपाच कोटींचे रस्ते खड्डयात !

जनदूत टिम    19-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Palghar ;
देशातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या तारापूर एमआयडीसी आणि परिसरात चार महिन्यांपूर्वी साडेपाच कोटी रुपये खर्च करून रस्ते बनवले खरे पण या रस्त्यांचे पितळ पावसाने साफ उघडे पाडले आहे.

तारापूर एमआयडीसीतील साडेपाच कोटींचे रस्ते खड्डयात 
अवघ्या दोन महिन्यांतच पावसाने हे रस्ते पार खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे हे रस्ते बनवताना एमआयडीसी आणि ठेकेदाराचे साटेलोटे होते काय, असा संतप्त सवाल तारापूरवासीयांनी केला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रात विविध प्रकारचे सुमारे बाराशे उद्योग कार्यरत आहेत. एमआयडीसीतील सर्व रस्ते चकाचक करण्याची घोषणा औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रशासनाने केली. त्यासाठी तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या टाकीनाका ते नवापूर नाका आणि मुकुत टॅक ते कुंभवली या रस्त्याच्या डांबरीकरणाचे आणि औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरणे व मजबुतीकरणाच्या कामासाठी जवळपास साडेपाच कोटी रुपयांचे काम बुधानी बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस देण्यास आले.
 
कंत्राटदारांनी मार्च, एप्रिलपासून कामाला सुरुवात केली. परंतु अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने पहिल्याच पावसात रस्त्याच्या डांबराचा संपूर्ण थर निघून बारीक खडी बाहेर आली आहे. वाहनांची प्रचंड वर्दळ असणाऱ्या मधुर हॉटेलच्या चौकातही मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना गचके खातच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे एमआयडीसीचे साडेपाच कोटी रुपये सपशेल खड्ड्यात गेले आहेत.
 
कंत्राटदाराची मुजोरी :
साडेपाच कोटी रुपये खर्चूनही रस्त्याची संपूर्ण धूळधाण झाल्याने तारापूर औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाने कंत्राटदाराला १७ जुलै रोजी पत्र दिले आणि या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत असे बजावले. परंतु पावसाने वीस दिवस उघडीप दिली असतानाही कंत्राटदाराने या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. कंत्राटदाराची इतकी मुजोरी का साडेपाच कोटींचा निधी मंजूर करताना एमआयडीसी अधिकाऱ्यांचे त्याच्याशी काही साटेलोटे आहे का, असा संतप्त सवाल केला जात आहे.
 
सध्या पावसाच्या असल्याने रस्त्यांची तात्पुरता दुरुस्ती केली जात आहे. पाऊस संपल्यानंतर रस्त्यांची पूर्ण दुरुस्ती करण्यात येईल. - मुकेश लांजेवार उपअभियंता, तारापूर एमआयडीसी