Atal Bihari Vajpayee Death Anniversary : "हे आहेत भारताचे भावी पंतप्रधान...

‘हे भारताचे भावी पंतप्रधान आहेत. अशी वाजपेयी यांची ओळख पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी करून दिली होती.

जनदूत टिम    16-Aug-2023
Total Views |
देशाच्‍या राजकारणामध्‍ये सर्व विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांची मने जिंकणारा नेता तसा विरळाच. मात्र ही किमया भाजपचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी साधली होती. भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांनी नेहमीच विकासाच्‍या राजकारणाला प्राधान्‍य दिले. आज (दि.१६ ऑगस्‍ट) त्‍यांची पुण्‍यतिथी. जाणून घेवूया अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या राजकीय जीवनातील ठळक घटनांविषयी…

हे आहेत भारताचे भावी पंतप्रधान
 
वाजपेयी हे १९४२ च्‍या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले होते. १९५१ मध्‍ये भारतीय जनसंघातून त्‍यांनी आपला राजकीय जीवनाला सुरुवात केली. १९५७ मध्‍ये बालारामपूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले. यानंतर तब्‍बल चार दशकांहून अधिककाळ त्‍यांनी राजकारणात आपले योगदान दिले
 
  • नेहरु यांची भविष्‍यवाणी खरी ठरली…
‘हे भारताचे भावी पंतप्रधान आहेत. अशी वाजपेयी यांची ओळख पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी एका विदेशातून आलेल्‍या व्‍यक्‍तीला करुन दिली होती. लोकसभेत त्‍यांनी केलेल्‍या भाषणानंतर नेहरु यांनी हा तरुण उद्‍याच्‍या भारताचे नेतृत्‍व करेल, अशी भविष्‍यवाणी केली होती. वाजपेयी यांनी आपल्‍या कर्तृत्‍वाने ही भविष्‍यवाणी खरी करुन दाखवली.
  • सर्वोत्‍कृष्‍ट वक्‍ता...
देशाच्‍या राजकारणातील सर्वोत्‍कृष्‍ट वक्‍ता, अशी अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख होती. त्‍यांचे अत्‍यंत सहजपणे आणि ‘पॉज’ घेत साधलेल्या संवादातून ते सभा जिंकत असत. संसदेच्‍या दोन्‍ही सभागृहातील त्‍यांनी नेहमीच आपले मत अभ्‍यासपूर्णरित्‍या मांडले.
 
हे आहेत भारताचे भावी पंतप्रधान
  • आणीबाणीमध्‍ये तुरुंगवास...
१९७५मध्‍ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. यावेळी वाजपेयी यांनी केंद्र सरकारच्‍या दडपशाहीला तीव्र विरोध केला. या काळात त्‍यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
लोकसभा निवडणुकीत वाजपेयी हे ९वेळा विजयी झाले. दोनवेळा राज्‍यसभा सदस्‍य राहिले. भाजपचे ते संस्‍थापक अध्‍यक्ष होते. २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९मध्‍ये त्‍यांनी भारताचे परराष्‍ट्रमंत्री पद भूषवले होते.
राष्‍ट्रीय नेते, नि:स्‍वार्थी सामजिक कार्यकर्ता, प्रभावी वक्‍ता, कवी, साहित्‍यिक, पत्रकार ही असे बहुआयामी व्‍यक्‍तिमत्‍व अशी ओळख असणार्‍या वाजपेयी यांची ओळख भाजपमधील उदारमतवादी नेते अशीही होती.
  • सत्तेसाठी राजकारण करणार नाही...
अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९६मध्‍ये १६ मे ते १जून या काळात प्रथम पंतप्रधानपद भूषवले. केवळ १३ दिवसांचा हा कालावधी ठरला. राजीनामा देण्‍यापूर्वी त्‍यांनी लोकसभेमध्‍ये केलेले भाषण हे ऐतिहासिक ठरले. राजकारणासाठी माझी तत्‍व आणि विचारांना सोडणार नाही, असे त्‍यांनी विरोधकांना ठणकावले होते. सत्ता येते आणि जाते आपण राजकारण हे सत्तेसाठी कधी केले नाही. यापुढेही सत्ताकारणासाठी राजकारण करणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. यानंतर त्‍यांनी ११व्‍या लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद भूषवले हाेते.

हे आहेत भारताचे भावी पंतप्रधान 
  • तीनवेळा भूषवले पंतप्रधानपद...
पंतप्रधान म्‍हणून देशाचे तीनवेळा नेतृत्‍व करणारे वाजपेयी हे कवी मनाचे होते. मात्र देशाच्‍या सुरक्षेसाठी त्‍यांनी १९९८ मध्‍ये अणु चाचणी घेण्‍याचे धैर्य दाखवले. मे १९९८ मध्‍ये वाजपेयी सरकारने अणुचाचणी घेतली.
विशेष म्‍हणजे, अमेरिकेचा विरोध झुगारत त्‍यांनी जगाला भारताच्‍या कणखर नेतृत्‍वाची ओळख करुन दिली. यावेळी त्‍यांनी राबवलेल्‍या परराष्‍ट्र धोरणांमुळेच भारताने घेतलेल्‍या अणुचाचणीचे रशिया आणिा फ्रान्‍स या देशांनी समर्थन केले होते. यावेळी अमेरिकेसह कॅनडा, जपान, इंग्‍लंड आणि युरोपीय महासंघाने भारतावर विविध क्षेत्रांत निर्बंध लादले. तरी वाजपेयी यांनी राबवलेल्‍या आर्थिक धोरणांमुळे भारताला याची झळ बसली नाही. यानतंर कारगील युद्‍धातही वाजपेयी यांच्‍या कणखर नेतृत्‍वाची ओळख जगाला झाली.
भारताने जून १९९९मध्‍ये ऑपरेशन विजय राबवले. यावेळी अमेरिकेने मध्‍यस्‍तीच प्रस्‍ताव ठेवला. मात्र तो धुडकविण्‍यात वाजपेयी यांनी काश्‍मीर प्रश्‍न आंतरराष्‍ट्रीय पातळीवर नेण्‍याचा पाकिस्‍तानचा प्रयत्‍न उधळला होता.
  • विरोधी पक्षांची मने जिंकणारे पंतप्रधान...
१९ मार्च १९९८ ते २६ एप्रिल १९९९ आणि पुन्‍हा १३ ऑक्‍टोबर १९९९ ते २२ मे २००४ या कालावधीमध्‍ये त्‍यांनी पंतप्रधान पद भूषवले. वाजपेयी यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकार असताना त्‍यांच्‍या वक्‍तृत्‍वामुळे आणि कार्यपद्‍धतीमुळे त्‍यांनी विरोधी पक्ष नेत्‍यांचीही मने जिंकली होती.
विराेधी पक्षाश असणार्‍या संवादामुळेच १९९४मध्‍ये काँग्रेस नेतृत्‍वाखालील सरकारने संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार आयोगाकडे भारताची भूमिका मांडण्‍याची जबाबदारी वाजपेयी यांना दिली होती.भारतरत्‍न हा देशातील सर्वोच्‍च नागरी सन्‍मान देऊन केंद्र सरकारने २०१४मध्‍ये वाजपेयी यांचा गौरविले. कवी मनाचा राजकारणी ते देशाला कणखर नेतृत्‍व देणारे वाजपेयी यांचे स्‍मरण आजच्‍या आणि येणार्‍या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.