'नीटी' मध्ये आता MBA...

पदव्युत्तर पदविकांचे रूपांतर, मुंबई "आयआयएम"मध्ये पुढील वर्षापासून प्रवेश.

जनदूत टिम    10-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai ;
नेशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग (नीटी) संस्थेचे 'इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट मध्ये (आयआयएम) नुकतेच रूपांतर करण्यात आले आहे. मुंबईला देशातील २१वे "आयआयएम" मिळाले आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर आता 'नीटी'मधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे पुढील शैक्षणिक वर्षापासून "एमबीए" अभ्यासक्रमांमध्ये रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर यापुढे संस्थेतील अभ्यासक्रमांना इंजिनीअरिंगबरोबरच अन्य विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनाहि प्रवेश दिला जाणार आहे.

नीटी मध्ये आता एमबीए 
'नीटी' संस्थेत सद्यस्थितीत पीजी डिप्लोमा इन सस्टेनिबिलिटी मैनेजमेंट पीजी डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग, पीजी डिप्लोमा इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. यापूर्वी या अभ्यासक्रमांच्या इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्याथ्र्यांनाच प्रवेश दिला जात होता. 'नीटी'चे 'आयआयएम' मध्ये रूपांतर झाल्यानंतर आता पुढील वर्षापासून एमबीए इन ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, जनरल एमबीए, एमबीए इन सस्टेनिबिलिटी हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत त्यातून विद्यार्थ्यांना 'आयआयएम' मधून आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेली एमबीए ची पदवी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
 
सध्या संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या पदव्युत्तर पदविकांना मान्यता मिळवताना अडचणी उद्भवत होत्या त्यातून या अभ्यासक्रमाला समकक्षता मिळविण्यासाठी विद्याथ्यांकडून ई-मेल प्राप्त होत होते. आता ही समस्या दूर होणार आहे, असे 'नीटी'चे संचालक मनोज कुमार तिवारी यांनी सांगितले.
 
दरम्यान, 'आयआयएम'चा दर्जा प्राप्त झाल्यानंतर संस्थेत पुढील वर्षांपासून अल्पकालावधीचे चार ते पाच अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्याचा विचार आहे. त्यामध्ये फायनान्शिअल मार्केट आणि टेक्नॉलॉजीसंदर्भातील अभ्यासक्रमांचा समावेश असेल. या माध्यमातून आणखी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सद्यस्थितीत पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना दोन्ही वर्षांचे मिळून सुमारे एक हजार विद्यार्थी संस्थेत शिकत आहेत. त्याचबरोबर सुमारे २०० विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमांना शिकत आहेत. नव्या अभ्यासक्रमांचा समावेश केल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर 'नीटी'कडून सद्यस्थितीत नव्याने दोन वसतिगृहांची उभारणी सुरू आहे, अशीही माहिती संस्थेतील प्राध्यापकांनी दिली.
 
निधी उभारावा लागणार !
नोटी ला 'आयआयएम' चा दर्जा मिळाल्यानंतर आता अधिक स्वायत्तता प्राप्त होणार आहे. मात्र त्याचवेळी संस्थेला मिळणारे अनुदान कमी होण्याची चिन्हे आहेत. सरकारकडून नवीन 'आयआयएम' ला काही प्रमाणात अर्थसाह्य केले जाते. मात्र त्यांनाही आर्थिक संसाधने उभी करावी लागतात. त्यामुळे संस्थेला स्वतःच निधी उभा करावा लागणार आहे.
 
शुल्क वाढणार ?
'आयआयएम'चा दर्जा मिळाल्यानंतर आता संस्थेतील अभ्यासक्रमांचे शुल्क वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र सध्याच्या 'आयआयएम'च्या तुलनेत हे शुल्क कमी असेल, असे 'नीटी'चे संचालक मनोजकुमार तिवारी यांनी नमूद केले. मात्र शुल्काबाबतचा निर्णय संस्थेच्या . मंडळाकडून घेतला जाईल, तसेच वंचित घटकातील मुलांसाठी शिष्यवृत्ती पुढेही सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले