काळू नदीच्या परिक्रमेद्वारे प्राचीन मार्गाचा शोध !

जनदूत टिम    10-Aug-2023
Total Views |
Thane : 
महामुंबई परिसरातील शहरांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित धरणामुळे चर्चेत असणाऱ्या काळु नदी परिक्रमेद्वारे कल्याण ते नाणेघाट या मागांच्या सद्यस्थितीचा  शोध माहितीपटाच्या आधारे घेण्याचा प्रयत्न अश्वमेध प्रतिष्ठानने केला आहे. नुकताच हा माहितीपट यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

काळू नदीच्या परिक्रमेद्वारे प्राचीन मार्गाचा शोध  
काठाच्या दोन्ही बाजूला असलेल्या काळ्या कभिन्न कातळाच्या प्रतिबिंबामुळे प्रवाह काळा दिसतो, म्हणून या नदीचे नाव काळू, अशी माहिती उल्हास खोऱ्यात संशोधन करणारे इतिहासतज्ज्ञ अविनाश हरड यांनी दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली हा 'सह्यावलोकन माहितीपट साकारला असून गेल्या महिन्यात मुलुंड येथे झालेल्या गिरिमित्र संमेलनात त्याला पारितोषिकही मिळाले आहे. मुंबई महानगरांलगत असलेल्या काळू नदीचा प्रवाह बऱ्याच प्रमाणात नितळ आणि शुद्ध आहे. अटाळी बंदरापासून या परिक्रमेला सुरुवात झाली. हरड यांच्यासह चौघांनी सायकलवरून प्रवासाला सुरुवात केली. दरम्यान आणखी तिघेजन यात  सहभागी झाले. या नदीकाठची संस्कृती, धार्मिक स्थळे, त्यांची सद्यस्थिती यांची सविस्तर नोंद घेणे, हा या मोहिमेचा उद्देश होता. ड्रीम कॅचरचे जय कैलास मनोरे आणि इन्टॅक्ट चॅप्टर ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारण्यात आला.
 
समृद्ध अन्नसाखळी :-
काळू नदीत टिटवाळा येथील प्रवाहात हे जलचर आढळतात. विशेषतः मोठी कोळंबी (कोच्या कोलंबी) येथे आढळून येते. जैवविविधतेतील या वैशिष्ट्यपूर्ण स्थानाचे जतन व्हायला हवे, अशी माहिती या लघुपटात सगुणा रुरल फाऊंडेशनचे चंद्रशेखर भडसावळे यांनी दिली आहे.
 
माळच्या पठारावरील विहीर :-
मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांमधून वाहणाऱ्या काळू नदीलगत असणाऱ्या माळच्या पठारावर एक वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे. कितीही मुसळधार पाऊस पडो वा दुष्काळ असो. या विहीरीच्या पात्रातल्या पाण्याची पातळी दीड फुटपेक्षा वाढत नाही किंव्वा कमी होत नाही.
 
नदीतले महाकाय बेट :-
शहापूर तालुक्यातील अंबर्जे गावाच्या हद्दीत काळू नदीच्या प्रवाहात असलेले १२८ हेक्टर क्षेत्रफळाचे बेट जैवविविधतेच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. या बेटाचे जतन, संवर्धन व्हायला हवे, असे मत अविनाश हरड यांनी व्यक्त केले आहे.
 
रांजण खळगे :-
वैशिष्ट्यपूर्ण भूगर्भीय अवस्थेमुळे काळू नदीच्या प्रवाहात काही ठिकाणी रांजण खळगे तयार झाली आहेत. त्यात बाराही महिने पाणी असते. मुरबाड तालुक्यातील वळू आणि शहापूर तालुक्यातील अंबर्जे गावांदरम्यान नदीच्या प्रवाहात आढळून येणारी हे रांजण खळगे पर्यटन तसेच भूगर्भशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी उपयोगी आहेत.
 
देवराईतले गाव :-
मुरबाड तालुक्यातील पाटाजवळील काळू नदीकाठच्या बनाची वाडी हे देवराईतले गाव आहे. या वनात मोठ्या प्रमाणात मधाची पोळी आढळतात. गावकरी याला देवाची पोळी असे म्हणतात. त्याचे जतन करतात. त्यामुळे आजूबाजूच्या पर्यावरणाचे आपोआप संवर्धन होत आहे, अशी माहिती जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये यांनी माहितीपटात दिली आहे.