पोलीस कल्याण निधीत गैरव्यवहार !!!

जनदूत टिम    28-Jul-2023
Total Views |
Maharashtra ; mumbai ;
पोलीस कल्याण निधीत गैरव्यवहार तसेच लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन यासह इतरही गंभीर तक्रारी असलेल्या परभणी जिल्हा पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात आली असून वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे अहवाल पोलीस महासंचालक यांजकडे पाठविण्यात येईल. ज्या गोष्टी चौकशीत पुढे येतील त्यानुसार कारवाई करु असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात दिले.

पोलीस कल्याण निधीत गैरव्यवहार  
 
सदस्य रत्नाकर गुट्टे यांनी यासंदर्भात विधानसभा नियम क्रं.१०५ अन्वये लक्षवेधी सूचना मांडली होती.संबंधीत पोलीस अधीक्षक यांनी टी.व्ही, संगणक खरेदीसाठी वेल्फेअर फंडाचा वापर केला.त्याची कोठेही नोंद नाही.टी.व्ही स्वतःच्या घरी ठेवले. पोलीस कल्याण निधीच्या ठेवी मोडल्या.त्याचेही रेकॉर्ड नाही.कोट्यवधीचा निधी स्वतःच्या निवासस्थानासाठी खर्च केला.कर्मचारी मंगल कार्य बांधकाम साहित्यातही गैरव्यवहार केला.सीसीटीएनएस प्रणाली सीआयडी क्राइम मार्फत चालवली जात असता त्यासाठी आठ लक्ष खर्च केला अशा सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी गुट्टे यांनी केली.
 
एखाद्यावर गुन्हा दाखल करायचा तर चौकशी करून करावा असे असता लोकप्रतिनिधी असूनही अचानक पहाटे दोन वाजता ३५४ चा गुन्हा दाखल केला याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 
उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले, शांतता समितीत अधीक्षकांविरुद्ध मुद्दा मांडला यावरून गुन्हा दाखल केला होता.त्या पोलीस अधीक्षकांची आता बदली केली आहे.आधी जो चौकशी अहवाल आला त्यामध्ये प्रोसीजर ऑफ लॅप्सेस दिसून आल्या आहेत. आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी मार्फत चौकशी सुरू आहे.
 
हक्कभंग प्रस्ताव दाखल :
सदर पोलिस अधीक्षक यांजविरुद्ध लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन केल्यामुळे हक्कभंग सूचना दिली आहे याचीही माहिती सदस्य रत्नाकर गुट्टे यांनी दिली. ते त्यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेतला असे स्पष्ट केले.