महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

मुख्यमंत्री यांनी घेतली सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सद‍िच्छा भेट

जनदूत टिम    24-Jul-2023
Total Views |
नवी दिल्ली ,  :
राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

मुख्यमंत्री यांनी घेतली सहकुटुंब  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सद‍िच्छा भेट
 
आज मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. श्री शिंदे यांनी त्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे नातु रूद्रांश यांच्या समवेत भेट घेतली.
 
या भेटी दरम्यान कुटुंबीयांची प्रधानमंत्री यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली असल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासोबतच राज्याच्या सर्वंकष विषयांवर चर्चा करून राज्यात सुरू असलेल्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पाठबळ असल्याचे आश्वासक आश्वासनही यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी दिले असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या ईशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या घटनेबाबत सहवेदन प्रधानमंत्री श्री मोंदी यांनी व्यक्त करत या दुःखाच्या समयी केंद्र सरकार खंबीरपणे पाठीशी उभे असल्याच्या भावना प्रधानमंत्री यांनी यावेळी व्यक्त केल्या असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबतची माहिती जाणून घेतली.
 
धारावी प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावेल त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा प्रधानमंत्री मोदी यांनी श्री शिंदे यांच्याकडून व्यक्त केली. त्याचबरोबर मुंबईतील पुनर्विकासांचे रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची चर्चा यावेळी झाली. यासोबतच प्रत्येक कुटुबांला हक्काचे घर मिळावे, असे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य त्या दिशेनेही काम करीत असल्याचे समाधान प्रधानमंत्री यांनी व्यक्त केले असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.