राष्ट्रवादी मंत्र्यांना आजच खाते वाटप? अजितदादा पवारांकडे अर्थ खाते?

जनदूत टिम    10-Jul-2023
Total Views |
मुंबई (मिलिंद माने)
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना आजच रात्रीपर्यंत खातेवाटप जाहीर केले जाणार असून अर्थमंत्रीपद अजित दादा पवार यांच्याकडेच राहणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

राष्ट्रवादी मंत्र्यांना आजच खाते वाटप
 
राज्यातील सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अर्थ ,महसूल ,सहकार, जलसंपदा ,अन्न व नागरी पुरवठा, ही महत्त्वाची खाती देण्यास शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी विरोध केला होता मात्र दिल्लीवरून याबाबत स्पष्ट संकेत दिल्याने या मंत्र्यांचा विरोध मावळल्याचे सांगण्यात येत आहे.
 
राज्य मंत्रिमंडळामध्ये सध्या एकनाथ शिंदे सह दहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह दहा व राष्ट्रवादीचे नव्याने मंत्री झालेले नऊ असे 29 जणांचे मंत्रिमंडळ राज्यात सध्या अस्तित्वात आहे मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर देखील अद्याप त्यांना . मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झालेली नाहीत.
 
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची याबाबत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा विरोध असला तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची हा निर्णय दिल्लीवरून झाला असल्याने त्याला राज्यातील मंत्र्यांनी विरोध करून काहीच उपयोग होणार नाही यामुळे शिंदे फडणवीस सरकारमधील विरोध करणाऱ्या मंत्र्यांचा विरोध कमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तेरा खात्यांचा पदभार आहे तर उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह ,अर्थ ,जलसंपदा, गृहनिर्माण ,ऊर्जा ,आणि राज्य शिष्टाचार अशा सहा महत्त्वाच्या खात्यांचा पदभार फडणवीस यांच्याकडे आहे.
 
राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने उपमुख्यमंत्री पद घेतलेले अजित पवार यांना अर्थमंत्री हे खाते देण्याचे दिल्लीवरूनच स्पष्ट आदेश असल्याने....
 
  1. अजित पवार हे राज्याचे नवे अर्थमंत्री असतील,
  2. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा ओबीसी बहुजन विकास,
  3. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खाते,
  4. धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय
  5. आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास,
  6. हसन मुश्रीफ यांच्याकडे वस्त्रोद्योग अल्पसंख्यांक विकास,
  7. संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा खाते,
  8. अनिल पाटील यांच्याकडे पशु व वैद्यकीय,
  9. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे आदिवासी विकास कल्याण
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त धुळे दौऱ्यावर आहे त्यांचा शासकीय दौरा पार पडल्यानंतर व ते मुंबईत आल्यानंतर खातेवाटपाच्या यादीवर अंतिम स्वाक्षरी होऊन आज रात्रीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाची खाती वाटप जाहीर केली जातील असे राजकीय निरीक्षकां कडून सांगितले जात आहे.