असंवैधानिक सरकारची वर्षपूर्ती नव्हे तर वर्षश्राद्ध !

दिलीप मालवणकर ९८२२९०२४७०    01-Jul-2023
Total Views |
गद्दारी करून मुख्यमंत्री पद मिळवलेले एकनाथ शिंदे व शिवसेना फोडण्यासाठी डिमोशन होऊन उपमुख्यमंत्री पद स्विकारावे लागलेले देवेंद्र फसवणीस या बिलंदर जोडीच्या असंवैधानिक सरकारला आज वर्ष झाले आहे. संपुर्ण वर्ष कोर्ट कचेरी, दिल्ली वा-या व सोबत आलेल्या आमदारांची मनधरणी करत व वांझोट्या घोषणांचा वेगवान तडका देत बिरबलाची हंडी शिजवणारे, सरकार जे सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवले, ज्या सरकारच्या मुख्यमंत्र्यावर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे, ज्या उपमुख्यमंत्रांना डोके असूनही खोकेबाजांबरोबर नाईलाजाने संसार करणे भाग पडत आहे,त्या गद्दारीचा पायावर मिंधेगिरी करीत वर्षपूर्ती करणा-या सरकारला वर्ष झाले तर त्यात विशेष काय ?
 
असंवैधानिक सरकारची वर्षपूर्ती नव्हे तर वर्षश्राद्ध
 
गजल नवाज भीमराव पांचाळे यांची एक गजल आहे- गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय अन काळी काय ? तसंच या सरकारचं झालं आहे. काहीही करून हे दुतोंडी गांडूळासारखे सरपटत सरपटत एक वर्षाचे झाले. त्यांच्यात ना ताळ ना मेळ. आत्ता तर काय एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा लागली आहे. भाजपचे आमदार व नेतेच स्वतःला १०५ डोकेबाज व ५० खोकेबाज असे उघडपणे बोलू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राच्या सुपिक डोक्यातून प्रसवलेली जाहिरात- केंद्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे ने तर आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. मिंघेंना या जाहिरातीबद्धल दिलगिरी व्यक्त करावी लागली, यातच सर्व आले.
हिंदूत्व वाचवण्यासाठी गद्दारी करणारे सरकार वारक-यांवर लाठी मार करते, हिंदू ह्रदय सम्राटांना आदर्श मानण्याचा दिखावा करणारे बाळासाहेबांच्या हयातीत बांधलेल्या शाखांवर बुलडोझर फिरवण्यात मर्दुमकी मानत आहेत, वांद्रेतील घटनेत तर बाळासाहेबांच्या फोटोवर घणाचे घाव घालत होते, ही शाखा तोडण्याचे सत्कर्म मुख्यमंत्रांच्या सुपत्राचेच होते, हेही उघडकीस आले आहे.
 
धर्मवीर आनंद दिघेंचा स्वयंघोषित पट्टशिष्य अशी जाहिरात करणारे शिंदे, आनंद आश्रमवरून आनंद दिघेंचे नामोनिशाण मिटवून कब्जा घेतात. टेंभी नाका भाजपमय करून टाकतात, ज्या वास्तुत शिवसेनेचे तोरण बांधण्याचे धोरण ठरविले जात होते, तेथुनच या गद्दारांकडून शिवसेना संपविण्याची कट कारस्थानं शिजवली जातात अशा गद्दारांच्या मुख्यमंत्र्याच्या काळवंडलेल्या कारकिर्दिची वर्षपूर्ती हा उत्सव नसून ते वर्षश्राद्धच आहे.
 
आगामी काही महिन्यातच हे असंवैधानिक सरकार गाडले जाणार आहे. भाजपच त्यांची कबर खोदण्याचे काम करीत आहे. गेले वर्षभर मंत्री मंडळ विस्ताराचे गाजर दाखवुन गद्दार आमदारांना थोपवून धरण्याची कसरत लाचारपणे व हतबलतेने मुख्यमंत्री करीत आहेत. हे सरकार एकवेळ भंग पावेल परंतू त्याचा मंत्री मंडळ विस्तार होणे असंभव आहे. दिल्लीतील बापसमान हायकमान शाहीने यांच्या खुंटीत पाचर मारून ठेवली आहे.यांना सहनही होत नाही व सांगताही येत नाही, अशी मुळव्याधी सारखी पाचर मारून ठेवली आहे. या विरोधात आवाज उठवण्याची वा उठाव करण्याची धमक या लाचार शिरोमणी गद्दारांत नाही. दिल्लीश्वराने नमस्कार करायला सांगितले तर यांनी लोटांगण घातले तरी दिल्लीतील अमितचंद शहा त्यांना भीक घालत नाही, पाच मंत्र्यांना वगळा अशी अट घातली गेली परंतू गद्दारीचे इनाम म्हणून दिलेली मनसबदारी काढून घेण्याची हिंमत या फितुर सरदारात नाही.
 
कसली वर्षपूर्ती करता ? आशीर्वाद शिवछत्रपतींचे एक वर्ष सुराज्याचे ? कोण सुचवतं अशा पुळचट घोषणा ? गद्दारांचा कडेलोट करणारे, हत्तीच्या पायाखाली चिरडणारे शिवछत्रपती यांना आशीर्वाद देणे कसे शक्य आहे ? अन्नदात्या व भाग्यविधात्या शिवसेनेची शकलं करणा-याच नव्हे तर ती संपविण्याच्या इराद्याने औरंग्यांना साथ देणा-या, गुवाहाटी येथे टेबलावर नाचणा-या फितुर अनाजीपंतांना छत्रपतींचा आशीर्वाद लाभेलच कसा ?
 
झालाच तर तुमचा सत्यानाश होईल, तुमचं वाटोळं होईल, निष्ठावंतांच्या तळतळाटाने तुमचे नामोनिशाण मिटून जाईल. गद्दारांचा हा प्रथम श्राद्धदिन आहे परंतू कावळे देखील त्यांच्यासाठी ठेवलेल्या अन्नाला शिवणार नाही. कावळ्यांना देखील स्वाभिमान असतो, ते माणसाला अस्पृश्य मानतात, माणसाचा हात वा स्पर्श जरी झाला तर सर्व कावळे त्याला चोची मारून मारून टाकतात. तेंव्हा गद्दारांच्या वर्षश्राद्धावर कावळे देखील बहिष्कार टाकतील!
 
सुराज्य कशाशी खातात ? ते तरी यांना माहित आहे का ? दिखाऊ कामांसाठी निधी व त्यातून कमिशन हे ज्यांचे मिशन आहे? त्यांनी सुराज्याच्या वल्गना करू नयेत. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन पापं धुऊन आलेले इडीग्रस्त शिवरायांचे नाव वापरतात हीच बाब संतापजनक आहे.