तमन्ना आणि इम्रान यांची राज्यसेवा परीक्षेत 'दुहेरी' बाजी

जनदूत टिम    08-Jun-2023
Total Views |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गेल्या वर्षी (२०२२) झालेल्या स्पर्धा परीक्षांचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालाचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे एका मुस्लिम दांपत्याला मिळालेले यश! तमन्ना हमीद शेख आणि इम्रान शफीक नायकवडी हे ते दांपत्य. राज्यसेवा परीक्षेद्वारे जोडीने अधिकारी झालेली मुस्लिम समाजातील महाराष्ट्रातील ही कदाचित पहिलीच जोडी असावी. तमन्ना यांची सेक्शन ऑफिसरपदी, (Section Officer) तर इम्रान यांची सहायक राज्यकर आयुक्त (Assistant Commissioner of State Tax) निवड झाली आहे. या अधिकारी दांपत्याची ही यशोगाथा... 

imanna n imran

इम्रान हे मूळचे साताऱ्याचे. त्यांचे वडिल 'कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक संस्थे'तील निवृत्त शिक्षक. माण (जि. सातारा) येथून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या इम्रान यांनी वारणानगरच्या (जि. कोल्हापूर) तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे, तर तमन्ना मूळच्या इंदापूरच्या. त्यांचे वडील पुण्यात 'भारत फोर्स मोटर्स'मध्ये नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बीएस्सी (स्टॅटिस्टिक्स) केले आणि त्यापुढचे उच्च शिक्षण मॉडर्न कॉलेज येथे घेतले.
 
या दांपत्याने हे यश कसे प्राप्त केले, तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा त्यांचा प्रवास कसा होता याविषयी दोघांचे मनोगत जाणून घेतले.
इम्रान म्हणतात, “माझ्या वडिलांचे अनेक विद्यार्थी अधिकारी आहेत. त्यांच्याकडून मला स्पर्धा परीक्षेला बसण्याची प्रेरणा मिळत गेली आणि मी अभ्यासाला लागलो. अभ्यासासाठी घरात खूप चांगला सपोर्ट होता; परंतु घरात पाहिजे तसा अभ्यास होत नव्हता, त्यामुळे मी पुणे गाठले व तिथे अभ्यास सुरू केला. काही वेळा अभ्यासाचा कंटाळा यायचा. बऱ्याचदा वाटायचे की, आता अभ्यास बंद करून आपला प्लॅन ‘बी’ एक्झिक्युट करावा. मात्र, आताचा हा आपला शेवटचाच अटेम्प्ट असेल याची जाणीवही मला त्याच वेळी व्हायची. त्यामुळे मी मन विचलित होऊ न देता अभ्यास सुरूच ठेवला.”
 
तमन्ना सांगतात, “स्पर्धा परीक्षा देऊन एक चांगली अधिकारी व्हायचे असे माझे स्वप्न होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा माझा निर्णय निश्चित होता. अभ्यासासाठी घरातून सपोर्टही चांगला होता. आई-वडिलांचे श्रेय आणि अभ्यासाची चिकाटी यामुळे एमपीएससी २०२० मधल्या परीक्षेद्वारे माझी नायब तहसीलदारपदी निवड झाली. मात्र, मला अपेक्षित असलेले पद तेव्हा मिळाले नाही, त्यामुळे मी अभ्यास सुरूच ठेवला व आणखी जोमाने एमपीएससी २०२१ च्या तयारीला लागले.”
 
कोरोनाकाळात अनेक परीक्षा पोस्टपोन झाल्या होत्या. परीक्षा पुनःपुन्हा पुढे ढकलल्या जात असल्याने काही विद्यार्थ्यांना अभ्यासाचा वैताग आला होता, तर काही विद्यार्थ्यांनी, ‘ही आणखी अभ्यास करायची संधी आहे,’ असे समजत कटाक्षाने अभ्यास केला. इम्रान हे दुसऱ्या प्रकारातले होते.
 
इम्रान सांगतात, “२०२०-२१ च्या दोन्ही परीक्षा कोरोनामुळे उशिरा झाल्या, त्यामुळे मला अभ्यास करायला आणखी वेळ मिळाला आणि २०२० च्या परीक्षेतून माझी उत्पादन शुल्क विभागात पोलीस उप-अधीक्षक (DYSP) पदावर नियुक्ती झाली.” मात्र, 'क्लास वन अधिकारी' होण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक पाहिलेले स्वप्न अजूनही अपूर्णच होते.
तमन्ना नायब तहसीलदारपदी, तर इम्रान डीवायएसपीपदी पोहोचूनही या दोघांच्याही स्वप्नांची तहान भागलेली नव्हती. त्यामुळे अभ्यासाची लिंक तुटू देऊन उपयोगाचे नव्हते. अपेक्षित पदासाठीची वाटचाल करायला हवी होती...त्यादृष्टीने दोघांनी अभ्यास सुरूच ठेवला.
 
इम्रान यांनी वर्षभर अभ्यास करून २०२१ ची परीक्षा दिली. हा त्यांचा पाचवा आणि शेवटचा अटेम्प्ट होता. परीक्षा चांगली गेली होती; पण तरी त्यांनी मनोमन ठरवले होते की, "आता अपेक्षित पद मिळाले नाही तर निराश न होता ठरल्यानुसार प्लॅन ‘बी’बाबत काम चालू करायचे." तर, तमन्ना स्पर्धा परीक्षेचा मागील चार वर्षापासून अभ्यास करत होत्या. हा त्यांचा चौथा अटेम्प्ट होता. आयुष्यात प्लॅन ‘बी’ असायलाच हवा हे स्पष्ट मत असलेल्या तमन्ना सांगतात, “स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानाच मी पोस्ट-ग्रॅज्युएशनही पूर्ण केले होते. एमपीएससीच्या या अटेम्प्टमध्ये मला जर यश मिळाले नसते तर मी आणखी एखादा अटेम्प्ट दिला असता.”
 
...आणि अखेर निकालाचा दिवस उजाडला. तारीख होती २५ मे २०२३. 
 
दोघांचेही स्वप्न साकार झालेला हा दिवस! त्या दिवसाचे वर्णन करताना इम्रान सांगतात, “निकाल लागला तेव्हा मी ड्रायव्हिंग करत होतो. मला काही कॉल्स आले; पण ड्रायव्हिंग करत असल्यामुळे मी कॉल रिसिव्ह केले नाहीत. मात्र, कॉल्स एकसारखेच येऊ लागले तेव्हा माझ्या लक्षात आले की, काहीतरी अर्जंट असणार. मी कॉल रिसिव्ह करायचे ठरवले. पुढचा कॉल माझ्या एका जवळच्या मित्राचा होता. मी कॉल रिसिव्ह केला आणि कानावर सुखावणारे शब्द पडले, ‘इम्रान तू क्लास वन ऑफिसर झालास.’
माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपण जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाले याचे अत्यंत समाधान वाटले. अपेक्षित पद मिळाल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला होता. मात्र, माझ्या द्विगुणित आनंदाला आणखीही एक कारण होते व ते म्हणजे माझी पत्नी तमन्ना हिचीसुद्धा याच परीक्षेत विभाग अधिकारी म्हणून निवड झाली होती. नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांकडून आमच्यावर शुभेच्छांचा वर्षावच सुरू झाला.”
 
तमन्ना सांगतात, “निकाल लागला त्या वेळी मी घरीच होते. निकाल लागला असल्याचे मलाही कळले ते एका मैत्रिणीचा फोन आल्यामुळेच. 'तू विभाग अधिकारी झाली आहेस,' ही आनंदाची बातमी मला तिच्याकडूनच कळली. 'आपण केलेल्या कष्टाचे सार्थक झाले आहे,’ अशी भावना त्या वेळी मनात दाटून आली. एक मुलगी म्हणून - आणि त्यातही अल्पसंख्याक समाजातील एक मुलगी म्हणून - अनेक ठिकाणी माझे सत्कार आयोजित करण्यात आले. आमचे लग्न झाले त्या वेळी, पती इम्रान आणि मी, दोघेही तसे सरकारी पदांवर होतोच; परंतु, २०२१ च्या परीक्षेच्या निकालातून अपेक्षित असलेली पदे मिळतील अशी आम्हा दोघांनाही अपेक्षा होती. तसेच झाले. आम्ही दोघांनीही जोडीने यश मिळवले, त्यामुळे खूप आनंद झाला. आमच्या या यशामुळे एखाद्या का होईना विद्यार्थ्याला प्रेरणा मिळाली तरी ते आमचे यश आहे असे आम्ही समजू.”
 
कुठल्याही टीकेला किंवा स्तुतीला सामोरे जाताना काय पथ्य पाळले याविषयी सांगताना तमन्ना आणि इम्रान म्हणतात, “लोकांच्या प्रश्नांनी डिप्रेस्ड् होणे किंवा कुणाच्या चांगल्या प्रतिसादाने हुरळून जाणे आम्ही टाळायचो. ‘अजून किती वर्षे नुसताच अभ्यास करणार आहात?’ असे जे लोक विचारायचे त्याच सगळ्या लोकांनी, आम्ही दोघेही अधिकारी झाल्याचा आनंद साजरा केला.”
तमन्ना आणि इम्रान यांचे लग्न झाले त्या वेळी त्या दोघांचीही पूर्वीच्या परीक्षांमध्ये अनुक्रमे पोलीस उप-अधीक्षक आणि नायब तहसीलदार या पदांवर निवड झालेली होती; परंतु, २०२२ च्या परीक्षेच्या निकालामध्ये दोघांचीही काही स्वप्ने दडलेली होती...ती आता साकार झाली आहेत. जोडीने अधिकारी झालेली मुस्लिम समाजातील महाराष्ट्रातील ही कदाचित पहिलीच जोडी असावी.
स्वतःच्या समाजाविषयी आशावाद व्यक्त करताना इम्रान सांगतात, “मुस्लिम समाजात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. एकंदरीत शिक्षण घेण्याचे प्रमाणही इतर समाजापेक्षा कमीच आहे; परंतु, शिक्षणाला दुसरा काहीही पर्याय नाही. चांगले शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागते. वाईट परिस्थितीतही कष्ट करून शिक्षण घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. शिक्षण म्हणजे फक्त डिग्री पूर्ण न करता 'स्किल डेव्हलपमेंट'वर भर द्यायला हवा; तसेच, एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेहमीच आपला प्लॅन ‘बी’ तयार ठेवायला हवा. कारण, सिलेक्शन होणाऱ्या मुलांचे प्रमाण आणि जाहिरातींमध्ये उल्लेख असलेल्या पदांचे प्रमाण यांत खूप तफावत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न तर करायलाच हवा; परंतु प्लॅन ‘बी’सुद्धा तयार ठेवायला हवा.”
 
तर, तमन्ना सांगतात, “स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून चिकाटीने अभ्यास करायला हवा. फक्त स्पर्धा परीक्षा हेच एक आपले विश्व आहे असे न समजता आपला प्लॅन ‘बी’सुद्धा तयार ठेवायला हवा; जेणेकरून स्पर्धा परीक्षांमध्ये जरी आपल्याला दुर्दैवाने अपयश आले तरी जीवनात आपण यशस्वी होऊ शकू. मात्र, सकारात्मक दृष्टिकोन बाळगूनच अभ्यास करायला हवा हेही खरे. विद्यार्थ्यांनी मोठमोठी स्वप्ने बघावीत...त्या स्वप्नांच्या परिपूर्तीसाठी पूर्ण क्षमतेने लढावे...कष्ट आणि मेहनत घेण्याची तयारी ठेवावी...आणि, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याला प्राधान्य द्यावे.”