ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच बनावट कागदपत्रांच्या आधारे केला नावावर !

जनदूत टिम    04-Nov-2023
Total Views |
Thane : Kalyan ;
Durgadi Fort Fraud Case: ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम भागातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची (Durgadi fort forged document) जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे एका व्यक्तीने आपल्या नावे केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्ती विरोधात विविध कलमांनुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयश शिर्के (सातवाहन) (accused Suyash Shirke) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे.

ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच बनावट कागदपत्रांच्या आधारे केला नावावर 
आरोपी सुयश हा माळशेज नाणेघाट व इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. बंटी-बबली या हिंदी चित्रपटात ताजमहल आपल्या नावाने करून बनावट कागदपत्राच्या आधारे विक्री करण्याचा प्रसंग या चित्रपटात दाखविण्यात आला. अशाच प्रकारे कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या जागेचे वंशज दाखूवन बनावट कागदपत्रांच्या आधारे ती जागा सुयश शिर्के याने स्वत:च्या नावे केली. मात्र, जागा विक्री होण्यापूर्वीच हा प्रकार कल्याण मंडळ अधिकारी असलेल्या प्रीती घुडे यांच्यामुळे उघडकीस आला. घुडे यांनी २ नोव्हेंबर रोजी सुयश शिर्के (सातवाहन) यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
नाहरकत दाखल्यासाठी अर्जही केला :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयश शिर्के याने १२ सप्टेंबर २०२२ रोजी किल्ल्याची जागा आपल्या नावाने करण्यासाठी नाहरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जात त्याने शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख करून कल्याण तहसील कार्यालयातील ५ ते ७ कागदपत्रांवर शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले कागदपत्र अर्जसोबत जोडले होते. या जागेचं प्रकरण ऐतिहासिक किल्ल्याविषयी असल्यानं मंजुरीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आलं होतं.
 
पत्रव्यवहारातून भलतीच माहिती आली समोर :
दरम्यानच्या काळात किल्ल्याची पडझड झाल्याने दुरुस्ती करावी म्हणून स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. किल्ल्या संदर्भात लेखी माहिती मागवली असता, ही जागा शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने त्यांच्याकडून दुरुस्तीची परवानगी घ्यावी असा उल्लेख करत पोलिसांना कळविण्यात आले.
 
अशा रीतीने घटना उघडकीस :
दुसरीकडे कल्याण मंडळ अधिकारी कार्यालयात या किल्ल्याच्या जागेसंदर्भात २४ फेब्रुवारी २०२३ रोजी दस्तावेज तपासणी झाली. दरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरसह अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी केलेले दस्तावेज आढळून आल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी कल्याण तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रीती घोडे यांच्या तक्रारीनंतर कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात सुयश शिर्के नामक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
अखेर शिर्के विरुद्ध गुन्हा दाखल :
यासंदर्भात साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घेटे यांच्याशी संपर्क साधला असता, दुर्गाडी किल्ल्याची जागा आपल्या वंशजाची आहे असे भासवून खोटी कागदपत्र तयार केल्याने सुयश शिर्के याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच शिर्के हा माळशेज नाणेघाट व इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याचं सांगितलं.