पुढील वर्षापासून महाविद्यालयांत चार वर्षांचाही पदवी अभ्यासक्रम !

जनदूत टिम    04-Nov-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai University ; 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आघाडी घेतली असून पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व संलग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ३/४ वर्षीय पदवी अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत बी.ए... बी.कॉम. आणि बी.एस्सी. चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांना
मंजुरी मिळाली आहे.

पुढील वर्षापासून महाविद्यालयांत चार वर्षांचाही पदवी अभ्यासक्रम 
 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने मानव्यविद्याशाखा, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या ३/४ वर्षीय पदवीचे अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला असून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यापीठातील सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता हे अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. यापूर्वी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित राज्यातील सर्वाधिक ६२ स्वायत्त महाविद्यालयांत ४ वर्षीय पदवीचे अभ्यासक्रम राबवण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठाला मिळाला असून राष्ट्रीय धोरणानुसार प्रागतिक दृष्टिकोन ठेवून सर्व ८१२ बिगर स्वायत्त महाविद्यालयासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला आहे.

पुढील वर्षापासून महाविद्यालयांत चार वर्षांचाही पदवी अभ्यासक्रम    
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी ३/४ वर्षीय पदवी अभ्यासक्रम तयार करताना प्रा. रवींद्र कुलकर्णी समितीच्या अहवालातील शिफारशी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय याचा सर्वकष विचार करण्यात आला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय, बहुआयामी, लवचिक, रोजगाराभिमुख आणि कौशल्याची जोड असलेले अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
 
मुंबई विद्यापीठाच्या ८७४ एवढ्या संलग्नित महाविद्यालयांची संख्या बघता साधारणतः 'अ' श्रेणी असलेल्या लीड महाविद्यालयांच्या अंतर्गत ८ ते १० महाविद्यालयांचा समूह म्हणून या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीची योजना तयार करण्यात आली आहे. यानुसार ३/४ वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी अंतर्गत सहा व्हर्टिकलची सुरळीत अंमलबजावणी होईल. समूह महाविद्यालयांतर्गत विविध व्हर्टिकल अंतर्गत बहुउद्देशीय आणि नाविन्यपूर्ण संयोजन शिकवण्यासाठी त्यांची संसाधने सामायिक केली जाणार ज्यामध्ये मायनर कोर्सेस, ओपन इलेक्टिव्स, व्हॅल्यू एज्युकेशन आणि को-करिक्युलर कोर्सेसचा समावेश असेल. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेली लवचिकता यामुळे प्रदान केली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने या महत्त्वपूर्ण टप्प्यांतर्गत पारंपरिक पदवीचे अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून उर्वरित व्यावसायिक पदवीचे अभ्यासक्रमही लवकरच तयार केले जाणार आहेत.
  
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेनेही वाटचाल करत विविध परदेशी विद्यापीठांबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार करणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले आणि एकमेव विद्यापीठ ठरले आहे.
 
"विद्यापीठाने हे एक महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. पदवीच्या या ३/४ वर्षीय अभ्यासक्रमांची आणि श्रेयांक आराखड्याची रचना करताना सर्वकष विचार करण्यात आला असून विद्यापीठाशी संलग्नित सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रगत, कौशल्याधिष्ठित, बहुउद्देशीय, बहुआयामी आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकता येतील." -
                                                                                                                       प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ