ठाणे मेट्रोची पहिली धाव भिवंडीपर्यंत...

सहा स्थानकांचे काम ८० टक्के पूर्ण; कशेळीत कारशेडची उभारणी.

जनदूत टिम    02-Nov-2023
Total Views |
Maharashtra : Thane ; 
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पातील अडथळ्यांची शर्यत पार करत ठाणे ते भिवंडी या साडेबारा किलोमीटरच्या पहिल्या टप्यात प्रवासी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे मेट्रोची पहिली धाव भिवंडीपर्यंत  
राज्य सरकार आणि 'एमएमआरडीए'ने स्थापत्य कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. ठाण्यातील बाळकूम ते भिवंडीचे प्रवेशद्वार असलेल्या धामणकर नाका या टप्प्यात सहा स्थानकांची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. तर कशेळी भागात कारशेड उभारले जाईल, असे 'एमएमआरडीए'च्या सूत्रांनी सांगितले.
 
सप्टेंबर २०२३ पर्यंत या मार्गिकांचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी 'जनदूत'ला दिली. या प्रकल्पात कारशेडची जागा सुरुवातीला कोनगाव येथे तर 'स्टॅबलिंग यार्ड' कल्याण एपीएमसी येथे करण्याचे प्रस्तावित होते. दुसऱ्या टप्यातील अडथळे लक्षात घेता कशेळी येथे कारशेड उभारण्यात येणार आहे. यासंबंधीची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. कारशेड या स्थानकालगत आणण्यात आल्याने पहिला टप्पा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
 
भिवंडी शहरात तीन किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे.
 
  • स्थानके
प्रकल्प उभारणीसाठी ८,४१७ कोटींच्या निधीस मंजुरी
 
बाळकूम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूर फाटा, धामणकर नाका ही सहा स्थानके. भिवंडी, गोपाळनगर, टेमघर, रांजणोली, गोवे गाव, कोनगाव, लाल चौकी, कल्याण स्थानक आणि कल्याण बाजार समिती अशी नऊ स्थानके आहेत.
 
  • भूमिगत मेट्रो
भिवंडी ते कल्याण या दुसऱ्या टप्प्यात राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर, टेमघरपर्यंत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाचा प्रश्न आहे. त्यामुळे धामणकर नाका ते टेमघर या साडेतीन किलोमीटर अंतर भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.