बदलापुरात धूर फवारणीच्या घोटाळ्यात कंत्राटदार सुळावर, अधिकारी मोकाट !

ठेकेदारावर गुन्हा दाखल करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न.

जनदूत टिम    30-Oct-2023
Total Views |
Maharashtra : Badlapur ; 
कोणत्याही ठेकेदाराने सादर केलेली कागदपत्रे बोगस आहेत की नाहीत याची तपासणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे होते. मात्र धूर फवारणीचा घोटाळा अंगलट येताच बदलापूर नगर परिषदेने कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून हात झटकले आहेत.

बदलापुरात धूर फवारणीच्या घोटाळ्यात कंत्राटदार सुळावर 
त्यामुळे हा कारभार म्हणजे कंत्राटदाराला सुळावर चढवून भ्रष्ट अधिकाऱ्यांना मोकाट सोडण्यासारखे असल्याचा संताप बदलापूरकरांनी व्यक्त केला आहे. कातडी बचाव कारभार करणाऱ्या पालिकेने कंत्राटदाराबरोबरच दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
 
२०२०-२१ या वर्षाकरिता कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने शहरात प्रभाग निहाय फॉगिंग मशीनद्वारे डास प्रतिबंधक धूर फवारणी करण्याची ई- निविदा तीन वर्षांकरिता मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे समर्थ पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस पालघर, मे. एव्हरग्रीन पेस्ट कंट्रोल सर्व्हिस कल्याण, मे. विघ्नहर पेस्ट कंट्रोल, पुणे, मे. बेस्ट पेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस नवी मुंबई व मे. शुभम महिला विकास मंडळ, ठाणे अशा निविदा पात्र करण्यात आल्या होत्या.
 
त्यातील शुभम महिला विकास मंडळाने सादर केलेल्या कागदपत्रांत ठाणे महानगरपालिकेचा तीन वर्षांचा धूर फवारणी अनुभव असलेला दाखला जोडला होता. त्याआधारे या कंपनीला हे काम देण्यात आले. मात्र चार महिन्यांपूर्वी माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी सदर संस्थेने सादर केलेला अनुभवाचा दाखला बनावट असल्याचा आरोप केला. त्यानुसार प्राथमिक चौकशी केली असता सदर संस्थेने निविदेसोबत सादर केलेल्या धूर फवारणीचे अनुभव प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे निदर्शनास आले. घूर फवारणीत ८१ लाख ९५ हजार ८०६ रुपयांचा चुना पालिकेला लागला आहे.
 
अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा.
ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी संबंधित अधिकारी मात्र मोकाटच राहिले असल्याचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी सांगितले. आम्ही अनुभव दाखला बनावट असल्याबाबतची तक्रार नगर परिषदेकडे दिली होती. त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची दखल न घेता सदर संस्थेला काम करू दिले.
 
त्यामुळे याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी, शहर अभियंता, लेखापाल, ऑडिटर, आरोग्य विभागप्रमुख यांची कमिटीही दोषी आहे. त्याशिवाय संगनमताने झालेला हा प्रकार असल्याने संबंधित ठेकेदाराकडून सदर रक्कम व्याजासह वसूल करावी अशी मागणी संभाजी शिंदे यांनी केली. दरम्यान अधिकाऱ्यांना वाचवले जात असल्याने त्याविरोधात राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी दिला आहे.