बिल्डरने घातला दीडशे कोटींचा गंडा !

पनवेलमध्ये तीनशे फ्लॅट ९०० जणांना विकले, फरार आरोपीला कोल्हापुरात अटक...

जनदूत टिम    25-Oct-2023
Total Views |
Maharashtra : Panvel ; 
घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून मध्यमवर्गीय माणूस हा कमी किमतीत फ्लॅट शोधत असतो. त्याचाच फायदा घेऊन पनवेलमधील एका बिल्डरने अजब जादू करीत एक फ्लैट तिघांना विकला. असे एकूण तीनशे फ्लॅट ९०० जणांना दिले असून बिल्डरने दीडशे कोटींचा गंडा घातला आहे. शिरीषकुमार चव्हाण असे या भुलभुलय्या फरार बिल्डरचे नाव असून तो कोल्हापूरमध्ये लपला होता. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून त्याने आणखी किती जणांना फसवले याचाही लवकरच भंडाफोड होणार आहे.

पनवेलमध्ये तीनशे फ्लॅट ९०० जणांना विकले 
 
शिरीषकुमार चव्हाण हा गेल्या ८ वर्षांपासून फरार होता. तो कोल्हापूरमध्ये आपली ओळख लपवून राहात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्याला सापळा रचून अटक केली. त्याच्या विरोधात पनवेल, वाशी आणि कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलजवळील सुकापूर विमलवाडी गट नंबर ७ व ८ येथे बिल्डर शिरीषकुमार चव्हाण याने इमारत बांधण्यास सुरुवात केली. या बांधकामादरम्यान त्याने एक फ्लॅट २ ते ३ जणांना विकला.
 
शिरीषकुमार याने जवळपास ३०० ग्राहकांची फसवणूक करून १५० कोटींचा गंडा घातला. त्यानंतर मुंबई आणि गावची मालमत्ता विकून तो फरार झाला. ग्राहकांची फसवणूक करून पोबारा करणाऱ्या या बिल्डरच्या विरोधात कृष्ण मोरे या ग्राहकाने तक्रार केली. या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी विशेष पथक नेमले. तसेच फसवणूक केलेल्या बिल्डरविरोधात समन्सदेखील बजावले होते. शिरीषकुमार हा कोल्हापुरात लपला असल्याची खबर लागताच पोलिसांनी तेथे जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.
 
८ वर्षांपासून फरार :
बिल्डर शिरीषकुमार चव्हाण याला पनवेल न्यायालयातून २०१६ साली जामीन मिळाला होता. त्यानंतर तो ८ वर्षे आपली ओळख लपवून राहात होता. या काळातदेखील त्याचे कारनामे सुरूच होते. एका ग्राहकाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर धागेदोरे मिळताच कोल्हापुरात जाऊन पोलिसांनी बिल्डरला ताब्यात घेतले.