भारतात २०२० मध्ये जन्मली सर्वाधिक प्री-मॅच्युअर बाळं !

जनदूत टिम    10-Oct-2023
Total Views |
Delhi :
२०२० हा कोविडच्या साथीचा काळ होता. भारतात सर्व आरोग्य यंत्रणा कोविडशी लढण्यात मग्न होत्या. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. याच काळात भारतात जगातील सर्वाधिक ३२ लाख प्री-मॅच्युअर बाळं जन्माला आली, अशी धक्कादायक माहिती लॅन्सेट या जगप्रसिद्ध नियतकालीकात प्रसिद्ध झाली आहे.

भारतात २०२० मध्ये जन्मली सर्वाधिक प्री-मॅच्युअर बाळं 
जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ व लंडन स्कूल ऑफ हायजीन आदींमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. कोविड काळात जन्माला आलेल्या बाळांपैकी तब्बल '५० टक्के 'प्री-मॅच्युअर' बाळे केवळ ८ देशांत जन्माला आली. त्यात भारत, पाकिस्तान, नायजेरिया, चीन, इथिओपिया, बांगलादेश, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि अमेरिकेचा समावेश आहे.
 
मोठी लोकसंख्या व सक्षम आरोग्य व्यवस्था नसल्याने 'प्री-मॅच्युअर' बाळांचे जन्म वाढले. उच्च दर्जाचे कुटुंब नियोजन, नवजात शिशूंसाठी आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने हे प्रकार वाढल्याचा निष्कर्ष या अभ्यासात मांडण्यात आला आहे.
 
२०२० मध्ये जागतिक स्तरावर १३.४ दशलक्ष बाळे 'प्री- मॅच्युअर' जन्माला आली. त्यातील १ दशलक्ष बाळे ही 'प्री- मॅच्युअर' गुंतागुंत झाल्याने मरण पावली. १० पैकी एक बाळ ही 'प्री-मॅच्युअर' जन्माला येतात. ३७ व्या आठवड्यापूर्वी ही 'प्री-मॅच्युअर' बाळे जन्माला आली.
 
मुलांच्या सुरुवातीच्या काळात 'प्री-मॅच्युअर' जन्म हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याने, 'प्री-मॅच्युअर' जन्मलेल्या बाळांची काळजी तसेच प्रतिबंधात्मक प्रयत्न-विशेषतः माता आरोग्य आणि पोषण, या दोन्ही गोष्टींना बळकट करण्याची तातडीची गरज आहे, जेणेकरुन बालपण टिकून राहणे सुधारेल," असे लेखक-संशोधकांनी म्हटले आहे.
 
ही प्रगत देशांचीही समस्या ;
'प्री-मॅच्युअर' बाळाचा जन्म ही समस्या केवळ कनिष्ठ व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांची नाही, जगातील अनेक देशांची ही समस्या आहे, असे संशोधकांनी दाखवून दिले. "प्री-मॅच्युअर' बाळाचे जन्माचे प्रमाण ग्रीसमध्ये ११.६ • टक्के तर अमेरिकेत १० टक्के आहे.