जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन

जनदूत टिम    25-Sep-2021
Total Views |

  • वकिलांनी पक्षकारांना लोकन्यायालयाचे महत्त्व पटवून द्यावे - जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे

ठाणे : लोकन्यायालयामध्ये सामंजस्य व तडजोडीने तोडगा काढण्यात येत असल्याने पक्षकारांमधील वाद मिटून नातेसंबंध टिकतात. त्यामुळे वकिलांनी पक्षकारांना लोकन्यायालयाचे महत्त्व पटवून जास्तीतजास्त प्रकरणे लोकन्यायालयात सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांनी केले.
 
jilha_1  H x W:
 
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन शनिवारी न्यायदान कक्षात झाले. त्यावेळी श्री. पानसरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रम्हे, बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे अध्यक्ष अॅंड. गजानन चव्हाण, ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅंड. प्रशांत कदम, जिल्हा सरकारी वकील अॅंड. संजय लोंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. देशपांडे उपस्थित होते.
 
न्यायाधीश श्री. पानसरे म्हणाले की, लोकन्यायालयांमध्ये होणाऱ्या तडजोडीने पक्षकारांना समाधानही मिळते. त्याचबरोबर तडजोडीच्या भूमिकेमुळे पक्षकारांमधील आपआपसातील वाद मिटून त्यांचे नातेसंबंधही टिकतात. पक्षकार हे वकीलांवर अवंलबून असतात, त्यामुळे वकीलांनी पक्षकारांना लोकन्यायालयाचे महत्व पटवून देवून त्यांना लोकन्यायालयात आणावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रम्हे म्हणाले, न्यायालयात येणारे पक्षकार एकमेकांना धडा शिकविण्याच्या नादात वेळ व पैसा खर्च करतात. त्यामुळे अंहकार बाजूला ठेवून सामंजस्याने, तडजोडीने प्रश्न सोडविले तर त्याचा फायदाही पक्षकारांनाच होतो.
 
मानवतेच्या दृष्टीकोनातून न्याय देण्यासाठी न्यायसंस्थेने लोकन्यायालयाचा निर्णय घेतला आहे, त्याचा लाभ पक्षकार, वकीलांनी घ्यावा, असे आवाहन बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे अध्यक्ष अॅंड. गजानन चव्हाण यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. देशपांडे यांनी स्वागत केले.