ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य तसेच केंद्र पुरस्कृत योजनांना गती द्या - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

जनदूत टिम    15-Sep-2021
Total Views |
ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य तसेच केंद्र पुरस्कृत योजनांना गती देतानाच या योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वांनी सतर्क रहावे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे केले.
केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी स्थापित जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
 
kapil5_1  H x W
 
त्यावेळी ते बोलत होते. आमदार सर्वश्री किसन कथोरे, दौलत दरोडा, कुमार अयलानी, प्रमोद पाटील, श्रीमती गीता जैन, जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, भिवंडी निजमापूर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. दयानिधी आदी उपस्थित होते.
 
केंद्र पुरस्कत योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. त्याचा योग्य विनियोग व्हावा. या योजनांची अंमलबजावणीसाठी सामुदायिक प्रयत्न करावेत. विविध विभागांनी राज्य आणि केंद्र शासन पुरस्कृत योजनांची यशस्वी अंमलबजावणी करताना समन्वयाच्या अभावातून या विकास योजनांच्या गतीला खीळ बसणार नाही यासाठी यंत्रणांनी सतर्क रहावे, अशी सूचना करतानाच कृषी विषयक योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल हे पहावे. तसेच स्वामित्व योजनेतून ठाणे जिल्ह्यातील घरांचे मालमत्ता कार्ड करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
 
जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावेत, यासाठीही प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
 
योजना अमंलबजावणीसाठी दिशा समितीचे महत्व- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीची स्थिती विशद केली. श्री. नार्वेकर म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात नागरी तसेच ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे केंद्र शासनाच्या योजनांच्या अमंलबजावणीसाठी दिशा समितीचे महत्व आहे. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी कार्यवाही करावी. यामाध्यमातून जिल्ह्यात संरचनात्मक कामांबरोबरच मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.
 
यावेळी स्मार्ट सिटी, अमृत, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, प्रधानामंत्री आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, मनरेगा, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, डिजीटल इंडिया, राष्ट्रीय आरोग्य अभियन आदी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात माहिती सादर केली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी बैठकीचे संचालन केले.