2 महिन्यातच वाहून गेला दगड गोट्यानी बांधलेला केटी बंधारा

हरेश साबळे    03-Aug-2021
Total Views |

  • शहापुर लघु पाठबंधारे विभागाचा प्रताप उघड

शहापूर (ठाणे) : शहापुर तालुक्यातील ९० टक्के बंधाऱ्यांना गळती लागली असताना आता नुकताच तीन महिन्यापूर्वी केलेला बंधारा वाहून गेल्याने जिल्हा परिषदेच्या लघु पाठबंधारे विभागाच्या बांधकाम दर्जावर साशंकता निर्माण झाली आहे. नदीला अल्प प्रमाणात पाणी असतानाच सिमेंट काँक्रीटचा बंधारा वाहून गेल्याची घटना चोंढे या ठिकाणी घडली आहे.
 
pat44_1  H x W:
 
शहापुर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून ९० टक्के बंधारे हे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येतात. या बंधाऱ्यांवर निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेले पाठबंधारे खात्याचे उप अभियंता कधीही पाहणीसाठी येत नसल्यामुळे ठेकेदार मातीमिश्रित वाळूने हे बांधकाम करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. चोंढे येथील नदीवर अंदाजे ३० लाख रुपये खर्च करून नियमबाह्य बंधारा बांधल्याने तीन महिन्यात वाहून गेल्याने पाठबंधारे खात्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
 
पाच दिवसात बांधला बंधारा
बंधारे बांधताना त्या ठिकाणी पडणारे पाऊस, वाहणारे पाणी याचा अंदाज घेऊन अंदाजपत्रक बनविले जाते. त्यासाठी कोणत्या प्रकारचे साहित्य सिमेंट, वाळू,खडीयाचे प्रमाण ठरलेले असते.मात्र सिमेंटचा वापर कमी केल्याने पाच दिवसात बांधून तयार केलेला चोंढे येथील बंधारा दोन महिन्यातच वाहून गेला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
 
लोकप्रतिनिधीच ठेकेदार
तालुक्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीने मागणी केल्यास तात्काळ मंजुरी दिली जाते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नद्या आणि ओढ्यांवर हे बंधारे बांधले जातात. मध्यंतरी जिल्हा परिषदेने निकृष्ट बंधाऱ्याच्या कारवाई संदर्भात मोहीम हाती घेतली होती. परंतु मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधीच ठेकेदार असल्याने ही मोहीम यशस्वी झाली नाही.