अवकाळी पावसाचा फटका आणि शासनाचा ठेंगा

जनदूत टिमहरेश साबळे    16-Aug-2021
Total Views |
डोळखांब : राज्यात २०२१ मधील जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊस झाला होता. याच कालावधीत शहापुर तालुक्यालाही अवकाळी पावसाने झोडपले होते.यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तसेच वीटभट्टी मालकांचेही अतोनात नुकसान झाले होते.मात्र शासनाने नुकताच जाहीर केलेल्या मदतीपासून शहापुर तालुका पुर्णतः वंचित राहिला असल्याने शेतकऱ्यांमधुन नाराजीचा सूर उमटत आहे.यामुळे दोषी नक्की कोण अधिकारी की लोकप्रतिनिधी असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.

sheti411_1  H x 
 
शहापुर तालुक्यात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पावसाने शेतक-यांवर अस्मानी संकट आणून शेतक-यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनावरच कोप केल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. तालुक्यातील अजनुप, वेलुक,वाशाळा,बेलवड, साजीवली, किन्हवली, डोळखांब, वासिंद, खर्डी,नडगाव या परिसरातील भाजीपाल्यावर अवकाळी पावसामुळे रोग पडुन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. मात्र त्यावेळी वरिष्ठांकडुन पंचनामे करण्याचे आदेश आले नसल्यामुळे तालुका पातळीवरून पंचनामे केले नसल्याचे सांगितले जाते. दरम्यान ११ ऑगस्ट २०२१ रोजी काढलेल्या शासन निर्णयातील विवरण पत्र (अ) मध्ये कोकण विभागातील ठाणे व पालघर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या शून्य दाखवली असल्याने हा शासन निर्णय अन्यायकारक असल्याचे बोलले जाते.
 
तथापी जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्याचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ई-आढावा बैठकीत निर्देश दिल्याचे ट्वीट केले होते. २०२१ मधील जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातील शेतीच्या पंचनाम्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशच नाहीत तर पंचनामे करणार कसे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
 
कोकण विभागासाठी जाहीर झालेली मदत
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यातील अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांची संख्या शुन्य दाखवली असल्याने पालघर जिल्ह्यात कदाचित नुकसान झाले नसेल मात्र ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होऊनही ते मदतीपासून वंचित राहिले आहेत.तर रायगड जिल्ह्यातील 205 शेतकऱ्यांचे 60.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने त्यांना 10.97 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 735 शेतकऱ्यांचे 215.19 हेक्टर क्षेत्र बाधित असुन त्यांना 39.93 लाख रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 194 शेतकऱ्यांचे 100.67 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 18.01 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.