मोखाड्यात चिकनगुन्या,डेंग्यूसदृश साथ

पारस सहाणे    08-Jul-2021
Total Views |
जव्हार : मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे हाता-पायांचे सांधे दुखत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे येथे साथसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याच्या संशयावरून मोखाडा आरोग्य विभागाने या ठिकाणी सर्वेक्षण केले. १७ नमुने तपासणीसाठी डहाणू येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
 
mokhad_1  H x W
 
इतर १० रुग्णांवर स्थानिक ठिकाणीच उपचार केले. वाकडपाडा येथे अशा शारीरिक तक्रारींचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने येथील मोखाडा पं. स. सदस्य प्रदीप वाघ व सरपंच संजय वाघ यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. या ठिकाणी तातडीने रुग्ण तपासणी व नमुने घेण्यात आले आहेत. यातील १७ रुग्णांमध्ये चिकुनगुन्या व डेंग्यूसदृश लक्षणे दिसत असल्याने या रुग्णांचे नमुने डहाणू येथे चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
 
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी संजय लोहार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला असून कंटेनर तपासणी व रुग्णांची लक्षणे यावरून हा प्रथमदर्शनी चिकुनगुन्या किंवा डेंग्यू असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. नमुना अहवाल आल्यानंतरच त्याबाबत स्पष्टीकरण मिळणार असल्याचे लोहार यांनी सांगितले.