शिवभक्त साकारतेय राज्यातील पहिले शिवरायांचे शिवमंदिर..... मंदिराचे काम ८० टक्के पूर्ण, पुढील वर्षी शिवजयंती किंवा शिवराज्याभिषेक दिनापर्यंत काम पूर्ण होणार....

जनदूत टिम    07-Jul-2021
Total Views |
भिवंडी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे साकारले जात आहे कोरणा मुळे या मंदिराच्या कामात अनेक अडचणी आल्या असल्या तरी मंदिराचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे पुढील वर्षी शिवजयंती किंवा शिवराज्याभिषेक दिनापर्यंत या मंदिराचे काम पूर्ण होणार आहे.
 
bhi44_1  H x W:
 
शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी व साईनाथ चौधरी या बंधूंच्या प्रयत्नांतून हे मंदिर सुमारे दीड एकर जागेत साकारले जात आहे.आतापर्यंत या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे दोन कोटींचा खर्च आला आहे .या कामासाठी ठाणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवप्रेमींनी हातभार लावला असल्याचे शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी सांगितले.
 
हे मंदिर किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात साकारण्यात येत असून, मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घडामोडींचा सचित्र आढावा घेण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. हे मंदिर उभारून छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करण्याचा आमचा उद्देश नाही तर मोगल साम्राज्याच्या काळात मंदिरांवर आक्रमणे झाली त्यातून छत्रपतींनी आपली मंदिरं वाचवली महाराजांच्या कार्याचा दैदिप्यमान इतिहास भावी पिढीला कळावा यासाठी हे मंदिर उभारण्यात येत असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.
 
या मंदिराच्या निर्माण कार्याची पाहणी करण्यासाठी रविवारी जागृती मंच पानिपत, ठाणे जिल्हा, मराठा सामाजिक प्रतिष्ठान कळवा, कर्तव्य आदींसह विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते गेले होते. यावेळी मंदिर परिसरात देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणुन भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी सायली भोसले यांनी शिवस्तुति सादर केली.
 
आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे भव्यदिव्य मंदिर पाहून अचंबित झालो शिवक्रांती प्रतिष्ठान व चौधरी बंधूंच्या कार्याची दखल इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदली जाईल यात शंका नाही. सदर परिसराला शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त करुन देण्याबाबत शक्य ती सर्व मदत केली जाईल.
- अधिक पाटील, तहसीलदार भिवंडी