वीज मंडळातील कटकवार यांच्या मेहनतीला वीज बिल वसुलीचा अडसर!

जनदूत टिम    07-Jul-2021
Total Views |
शहापूर : गेले चार वर्षात शहापूर तालुक्यातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाच्या निर्देशांनुसार व शाखा कार्यालयाच्या देखरेखीखाली शहापूर तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर शासनाच्या विविध योजना राबवून तसेच महावितरण कडून दुरूस्ती व देखभालीच्या कामांनी कायम स्वरूपात तोडगा काढुन शहापूर तालुक्याला २४ तास अखंडीत विज पुरवठा करण्याच्या हेतुने अनेक पाऊले उचलली आहेत. त्या कामांचा तपशिल सारांश स्वरूपात खालील प्रमाणे:..
 
Power-bill_1  H
 
१. महावितरणच्या शहापूर कार्यालयाने प्रामुख्याने शहापूर तालुक्यातील गेली ७० वर्षांपासुन ज्या-ज्या गावांमध्ये आतापर्यंत विज पुरवठा झाला नव्हता अशा गावांमध्ये विविध योजनांमार्गे विद्युतीकरण करण्याची कामे केली आहेत. ज्यामध्ये पतकीचापाडा, तरीचापाडा, बोरीचामाळ, साखरपाडा, मसणेपाडा, मोडुळपाडा, सावरदेव, गरेळपाडा, चक्कीचापाडा, चऱ्याचापाडा या सारख्या ३७ गावांना विज पुरवठा करून तेथील १३५२ कुटुंबांना विद्युतीमय करण्याचे काम शहापूर मधील महाविरणच्या कार्यालयामार्फत करण्यात आलेले आहे.
 
२. शहापूर तालुक्यातील शिसवली-मिसवली व तलवाडा गांवांना अदयाप काही तांत्रिक कारणास्तव व वनविभागाच्या परवाणगी प्रलंबित असल्याने तेथील भागास विद्युत पुरवठा करण्याचे प्रलंबित आहे. परंतु वनविभाग व महावितरणचे शहापूर कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नांनी यावर प्रशासकिय कार्यवाही सुरू असून संबंधित गावांना यावर्षात विज पुरवठा पुर्ण करण्याचा मानस या कार्यालयाचा आहे.
 
३. मा. पंतप्रधान भारत यांच्या महत्वाकांक्षी “सौभाग्य हर घर बिजली” या योजनेतुन शहापूर शहरालगत असलेल्या व इतर ग्रामिण भागात जेथे विजेच्या समस्या फार मोठया प्रमाणात होत्या अशा गावांना एकुण ३६ रोहित्र बसवुन संबंधित गावांना विजच्या समस्यांतून मुक्त करण्याचे काम महाविरतणच्या शहापूर कार्यालयाकडुन करण्यात आले आहे. सदर योजनेचा लाभ शहापूर शहरालगत असलेल्या माहुली गडाच्या पायथ्याशी असलेले जुनवनीपाडा, म्हसमलपाडा, सावरोली, शेकटपाडा, सुतारपाडा, आंबेडोह व ग्रामिण भागातील अघई सारख्या अतिशय दुर्गम भागातील वाडया-पाडयांना झाला. याव्यतिरिक्त डी.पी.डी.सी.. दिनदयाल ग्रामिण ज्योत योजना, नवसंजीवनी योजना यांसारख्या योजनेतुन गेली चार वर्षात जवळपास नव्याने २०० रोहित्रांची उभारणी करण्यात आलेली आहे.
 
४. शहापूर तालुका हा अतिदुर्गम भागात असुन तालुक्यातील बरेचसे लोक हे डोंगरदऱ्यांच्यासानिध्यात राहतात, अशा लोकांना महावितरणच्या नियमित अंदाजपत्रकांची रक्कम भरून विज कनेक्शन घेणे शक्य नसल्याने अशा विज ग्राहकांना महाविरतणच्या शहापूर कार्यालयाने “महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत रू. ५००/- किंवा याहुनही कमी रक्कमेचा भरणा करून तालुक्यात अंदाजे ५३०० . इतक्या विजपासुन वंचित असणाऱ्या ग्राहकांना विज पुरवठा करण्याचे काम केले आहे. सदर योजनेचा लाभ डोळखांब, वेळुक, फुगाळे, अघई, नांदवळ, मोरेपाडा, माळ, विहीगांव, सावरकुट, टेंभा, वैतरणा, भातसा, बिरवाडी यांसारख्या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या अनेक वाडया-पाडयांना याचा लाभ झाला.
 
५. शहापूर शहराला विद्युत पुरवठा करणाऱ्या २२ केव्ही उच्चदाब वाहिनीचा संपूर्ण कंडक्टर गेली तीन वर्षात टप्याटप्याने बदली करण्यात आला आहे. तसेच शहापूर शहरातील खालचा नाका ते चेरपोली, पंडीतनाका पर्यंत विद्युत पुरवठा करणाऱ्या लघुदाब वाहिनी पूर्णपणे बदलवून नविन लघुदाब वाहिनींचे विद्युत जाळे कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच शहापूर शहराची विज गळती रोखण्याकरीता शहरातील एकुण तीन हजाराहून अधिक नादुरूस्त असलेले विद्युत मिटर बदलविण्यात आले आहेत. तसेच एक हजाराहून अधिक विद्युत मिटर ग्राहकांच्या घरातून काढुन बाहेर लावण्यात आले आहेत.
 
६. गेली ४ वर्षात महाविरतणच्या शहापूर कार्यालयामार्फत दिनदयाल उपाध्याय ग्रामिण विद्युत योजने अंतर्गत एकुण ४०० उच्चदाब वाहिनीचे खराब पोल बदलविण्यात आलेले आहेत. तसेच महाविरणच्या देखभाल व दुरूस्ती योजने अंतर्गत शहापूर तालुकयातील एकुण ३८० उच्चदाब वाहिनीचे पोल व ७०० हून अधिक लघुदाब वाहिनीचे नादुरूस्त पोल बदलविण्यात आलेले आहेत.
 
७. गेली वर्षानुवर्षे शहापूर तालुक्यातील वासिंद परिसराकरता प्रस्तावित असलेले २२/२२ केव्ही टाटा उपकेंद हे अथक प्रयत्नांतुन सुरू करण्यात आले आहे. ज्यामुळे वासिंद शहर व इतर ग्रामिण भागाला. नव्याने अखंडीत विज पुरवठा करण्याकरीता दोन उच्चदाब वाहिनी कार्यान्वित करण्यात आले आहे, शहापूर ग्रामिण शाखे अंतर्गत असलेल २२/२२ केव्ही कर्मा उपकेंद्र सुरू करून ग्रामिण भागातील धसई व लगतचा परिसर यांना अखंडीत विज पुरवठा करण्यास मदत झाली आहे. तसेच शहापूर ग्रामिण विभागातील आटगांव व अघई भागाकरीता प्रस्तावित असलेले २२/२२ केव्ही आटगांव उपकेंद्राचे काम पुर्णत्वास येत असून येणाऱ्या महिनाभराच्या कालावधीत सुरू करण्याचा महावितरण शहापूर कार्यालयाचा मानस आहे.
 
८. सन २०१६-१७ सालापूर्वी शहापूर तालुक्यातील विज गळतीचे प्रमाण हे ४२.४% इतक्या मोठया प्रमाणात होते. गेली ४ वर्ष महावितरणच्या शहापूर कार्यालयाच्या अधिपत्याखाली सर्व शाखा अभियंता व जनमित्रांनी मिळुन विज चोरीस आळा घालण्याकरीता विज चोरांवर धडक कारवाई केली ज्यातुन १८८१ ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ अन्वये कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अंदाजे २,७७,५४,३०९/- रूपये इतक्या रकमेचे बिल अदा करण्यात आलेले आहे. पैकी ७०% लोकांनी विज बिलांचा भरणा करून महाविरतण कडुन रितसर नविन विज कनेक्शन घेऊन विद्युत पुरवठा करून घेतला आहे. ज्याचेच फळ म्हणून सद्य:स्थितीत शहापूर तालुक्याची विज गळती ही ३४.८९% च्या खाली आली आहे.
 
९.शहापूर तालुक्याकरीता वरिष्ठ कार्यालयांमार्फत तांत्रिक बाबींना अनुसरून विज गळतीचे प्रमाणाचे ध्येय २०% इतके देण्यात आले आहे. ज्याचे अवलोकन करता आजही शहापर तालुक्यात २ दशलक्ष इतक्या युनिटची गळती प्रतिमाह सुरू आहे. ज्याची रक्कम अंदाजे १ कोटी ६० लाख इतकी आहे. ही रोखण्याकरीता महावितरणच्या शहापूर कार्यालयाकडन यापुढेही विज चोरांवर धडक कार्यवाही करण्याचे सत्र सुरूच राहील. महावितरणचे शहापर कार्यालयाने जर सदर विज गळतीचे ध्येय प्राप्त केले तर शहापूर तालुक्यातील इतर कामांकरीता लागणाऱ्या अनुदानात वाढ होऊन त्याचा फायदा शहापूर तालुक्यातील विद्युत ग्राहकांना होईल.