पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त…… कल्याण तालुक्यात भात शेतीचे नुकसान भात लावणीसाठी बळीराजाला पावसाची प्रतिक्षा

जनदूत टिम    05-Jul-2021
Total Views |
कल्याण : कल्याण ग्रामीण भागात पावसाने दडी मारल्याने भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीच्या रोपांची लावणी खोळंबली आहे.
 
farmer_1  H x W
 
रोपे तयार झाली असून, पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसापासून कल्याण परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असून भात लावणी करण्यासाठी आवणांत चिखल नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. कल्याण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात पीक घेतले जाते. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, मजुरीचा खर्च, लागवडीचा खर्च करून या पिकांची लागवड केली आहे. भात रोपांची बऱ्यापैकी वाढ झाल्याने त्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे.
 
मात्र पाऊस नसल्याने भात रोपांना खते सुद्धा देता येत नसल्यामुळे कल्याण परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम वाया जाण्याची भीती वाटत आहे. भात या पिकाचे रोप तयार करून नंतर लावणी केली जात असल्यामुळे एकदा रोप खराब झाल्यावर दुबार लावणी करणे शक्य नसते. त्यामुळे बळीराजाला वर्षभराच्या पिकांवर पाणी सोडून द्यायची वेळ आली आहे.