ठाणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समिती सभापती पदी प्रकाश तेलीवरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर आणि विषय समिती सभापती पदी वंदना भांडे यांची बिनविरोध निवड

जनदूत टिम    19-Jul-2021
Total Views |
ठाणे : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती, समाजकल्याण समिती सभापती, आणि एक विषय समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजकल्याण समिती सभापती पदी प्रकाश तेलीवरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर आणि विषय समिती सभापती पदी वंदना भांडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी ,ठाणे अविनाश शिंदे यांनी घोषित केले.
 
thane4_1  H x W
 
निवडणूकीच्या प्रक्रीयेकरीता ठाणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ) तथा सदस्य सचिव अजिंक्य पवार उपस्थित होते. समाजकल्याण समिती सभापती पदी निवड झालेले प्रकाश तेलीवरे हे भिवंडी तालुक्यातील कांबे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. तर महिला व बाल कल्याण समिती सभापती निवड झालेल्या श्रेया गायकर या भिवंडी तालुक्यातील पडघा गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.
 
त्याचबरोबर विषय समिती सभापती पदी निवड झालेल्या वंदना भांडे या शहापूर तालुक्यातील गोठेघर गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. कोविड १९ नियंत्रणासाठी शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व सुरळीत पार पडल्याचे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी ,ठाणे अविनाश शिंदे यांनी सांगितले.