क्रीडाक्षेत्राला कोरोनाचे ग्रहण

- श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे    18-Jul-2021
Total Views |
कोरोनाचा फटका जसा इतर क्षेत्राला बसला तसा तो क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. कोरोनामुळे मैदाने ओस पडली. खेळाडूंना पुरेसा सराव मिळाला नाही. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या अथवा लांबणीवर पडल्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासूम पुन्हा मैदाने गजबजू लागली. कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने, दुसरी लाट ओसरल्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ लागल्या. त्यामुळे क्रीडारसिकही सुखावले पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा क्रीडा क्षेत्रात शिरकाव केला त्यामुळे पुन्हा काही स्पर्धा लांबणीवर टाकाव्या लागल्या तर काही रद्द कराव्या लागल्या.
 
corona0256_1  H
 
१) कोरोनामुळे आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करावी लागली
कोरोनाचा पहिला मोठा फटका बसला तो जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला. यावर्षी आयपीएलचे सामने भारतात खेळवण्यात आले. पूर्ण सुरक्षित वातावरणात आणि प्रेक्षकांविना आयपीएल खेळवण्यात आल्याने आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही अशी ग्वाही बीसीसीआयने दिली पण आयपीएल अर्ध्यावर आली असतानाच पंजाब, राजस्थान आणि चेन्नई संघातील काही खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाची बाधा झाली त्यामुळे अर्ध्यावरच स्थगित करावी लागली. आयपीएलचा उर्वरित हंगाम आता सप्टेंबरमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे पण तेंव्हादेखील आयपीएल होईल की नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही.
 
२) भारत - श्रीलंका मालिका
भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असल्याने बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असलेला दुसरा संघ पाठवला. या मालिकेत भारत श्रीलंका यांच्या दरम्यान तीन एकदिवसीय व तीन टी २० सामन्यांची मालिका होणार आहे या मालिकेची सुरवात १३ जुलैपासून होणार होती पण मालिका सुरू होण्याच्या आधीच श्रीलंका संघाच्या फलंदाजीची प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि कामगिरी विश्लेषक निरोशन कोरोना बाधित झाले त्यामुळे या मालिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले ही मालिका रद्द करावी अशी मागणी होऊ लागली पण श्रीलंकन बोर्डाला या मालिकेतून मोठा महसूल मिळणार असल्याने मालिका रद्द करणे त्यांना शक्य नव्हते म्हणून मालिका रद्द करण्याऐवजी ती पुढे ढकलली. आता या मालिकेतला पहिला सामना १८ जुलैला खेळवला जाणार आहे. या मालिकेत कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या खेळाडू व सपोर्ट स्टाफने इतका धसका घेतला की खेळाडू व प्रशिक्षक हे पीपीई किट घालून मैदानात सराव करत होते. पीपीई किट घालून खेळाडूंनी सराव करतानाचे चित्र मोठे मजेशीर दिसत होते. उद्या प्रत्यक्ष सामन्यातही खेळाडू पीपीई किट घालून खेळू लागले तर आश्चर्य वाटायला नको.
 
३) भारत - इंग्लंड मालिका
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला कोरोनाची बाधा झाली आहे. ऋषभ पंत सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकांच्या घरी विलगिकरणात आहे. ऋषभ पंत पाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे. हा सदस्य संघातील नसून सपोर्ट स्टाफमधील आहे. त्यालाही विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. ऋषभ पंतला कोरोनाची बाधा झाल्याने भारतीय संघाच्या मिशन इंग्लंड मोहिमेला मोठा धक्का बसला आहे कारण ऋषभ पंत हा भारताचा महत्वाचा खेळाडू आहे. तो संघात असणे गरजेचे आहे कारण तो मॅच विनर आहे. या दौऱ्यात भारत पाच कसोटी सामने खेळणार आहे. या दरम्यान जर आणखी काही खेळाडू कोरोना बाधित झाले तर ही मालिका देखील अर्ध्यावरच रद्द करावी लागेल.
 
4) ऑलिम्पिकभोवती कोरोनाचा वाढता फेरा
२३ जुलै पासून जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होणार आहे. वास्तविक ही स्पर्धा गेल्याच वर्षी होणार होती पण कोरोनामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. यावर्षी ही स्पर्धा सुरळीत पार पडेल असे वाटत असतानाच स्पर्धा जेमतेम एका आठवड्यावर असताना टोकियोत गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक रुग्ण आढळले. त्याचबरोबर ब्राझील ऑलिम्पिक पथकाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्येही काही लोक कोरोना बाधित आढळले. केवळ ब्राझिलच नव्हे तर विविध संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमधील कर्मचारीही कोरोना बाधित आढळले आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे पथक ज्या विमानातून आले त्या विमानातील एक प्रवासीही कोरोना बाधित आढळला त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे पूर्ण पथक विलगीकरणात आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल होत असलेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत रोज कोरोना बाधित आढळत आहे त्यामुळे आयोजन समितीचे सदस्य चांगलेच धास्तावले आहेत. जर रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर ऑलिम्पिक अर्ध्यावरच रद्द करण्याची नामुष्की आयोजन समितीवर येऊ शकते. केवळ आयोजन समितीचे सदस्यच नाही तर खेळाडूही धास्तावले आहेत. अव्वल गोल्फपटू ऍडम स्कॉट तसेच टेनिसपटू रॉजर फेडरर यांनी ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे.
 
एकूणच कोरोनाने क्रीडा क्षेत्राला चांगलेच घेरले आहे. क्रीडा क्षेत्राला लागलेले हे कोरोनाचे ग्रहण लवकर सुटावे अशीच प्रार्थना क्रीडारसिक करीत आहेत.