कोरोना काळात ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा(खोपटे)तर्फे रहिवाशांची एक वर्षाची घरपट्टी माफ

जनदूत टिम    12-Jul-2021
Total Views |

  • घरपट्टी माफ करणारे महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत
  • सुजित म्हात्रे,रितेश ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

उरण : कोरोना काळात नागरिकांचे होत असलेले हाल, आर्थिक परिस्थितीचा विचार करता गोरगरिबांना न्याय देता यावा तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक सवलत मिळावी या दृष्टिकोनातून निरपेक्ष वृत्तीने, निःस्वार्थ भावनेने ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडाचे उपसरपंच सुजित भालचंद्र म्हात्रे तसेच ग्रामपंचायत सदस्य रितेश सदानंद ठाकूर यांच्या पुढाकारातून ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे )मधील सर्व रहिवाशांचे,ग्रामस्थांचे सन 2020-21 या काळातील त्यांच्या घरांच्या घरपट्टी माफ करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे असा ऐतिहासिक व महत्त्वाकांक्षी निर्णय घेणारी बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

ura889_1  H x W 
 
देशावर आलेल्या covid-19 या संकटामुळे सरकारने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे खोपटे गावातील जनता ही पहिले तीन-चार महिने covid-19 च्या भीतीने घरातच राहिले. त्यामुळे काही जणांना नोकरी गमवाव्या लागल्या.तर काहींना अर्धे पगार मिळाले,तर काहींना पगार न मिळाल्याने प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती कोरोनाच्या काळात बिकट झाली होती. तर हातावर पोट भरणाऱ्यांची स्थिती याहून गंभीर होती. खोपटे ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्नही भरपूर असल्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती चांगली होती.
 
या दरम्यान घरोघरी जाऊन घरपट्टी वसुली करणे चालू होते घरपट्टी भरणे ग्रामस्थांना शक्य नव्हते. त्यामुळे हे घरपट्टी घेणे त्वरित थांबविण्यात यावे व सन 2020-21 चालू वर्षात घरपट्टी पूर्णपणे माफ करण्यात यावे तसेच त्यांच्या घरी जाऊन घरपट्टी वसूल करण्यात आलेली आहे त्यांना ती परत देण्यात यावी व गोरगरीब जनतेला न्याय देण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजित म्हात्रे व ग्रामपंचायत सदस्य रितेश ठाकूर यांनी ग्रामसेवक डी एम तुरे यांच्याकडे केली होती.
 
घरपट्टी माफ करण्याच्या सुजित म्हात्रे, रितेश ठाकूर यांच्या मागणीचा विचार करता ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे )या ग्रामपंचायतीची मासिक सभा दिनांक 31/10/ 2020 रोजी सर्व सदस्यांच्या मदतीने घेण्यात आली. विषय नंबर 15 अन्वये ठराव नंबर 63 द्वारे ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे )हद्दीतील सर्व ग्रामस्थांचे सन 2020-2021 दरम्यानचे घरपट्टी माफ करण्यात आली.सन 2020-21 च्या आर्थिक परिस्थिती वर्षाची ग्रामपंचायत हद्दीतील कुटुंबाची माफ केलेली घरपट्टी कराची रक्कम ही घरपट्टी कराच्या सर्व पावत्या फाडून वसूल करण्यात यावी व सदर होणारी कराची रक्कम ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 15 टक्के मागासवर्गीय (इतर) रक्कम मधून खर्च करण्यात (दाखविण्यात) यावी व त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी असा ठरावही सभेत करण्यात आले.आणि या ऐतिहासिक,महत्वकांक्षी, लोकहितकारी निर्णयाला ग्रामपंचायत तर्फे मान्यताही देण्यात आली.
 
ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा या गावांमध्ये मार्च 2020 मध्ये कोविड -19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. सदर संसर्ग रोगाचा सामना ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कुटुंबांना करावा लागला. त्यात अनेक स्त्री पुरुष लहान मुले यांना रोगाची लागण होऊन ते आजारी पडले. तर शासनाने लॉकडाऊन सुरू ठेवल्याने काही व्यक्तींचे उद्योगधंदे बंद पडले. तर काही लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या.या आजारामुळे काही रुग्णांना मोठ्या मोठ्या खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागले आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वैद्यकीय बीले भरावे लागले.कुटुंबाच्या गरजा भागविताना आर्थिक ताण तणाव निर्माण झाले. कुटुंबाना तारेवरची कसरत करावी लागली. या आर्थिक संकटातुन अजूनही ग्रामस्थ सावरले नाहीत.
 
परिणामी या कुटुंबांना आर्थिक सवलती देऊन आधार देण्याचे कामी ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा क्षेत्रात असणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाच्या घरावर आकारण्यात येणारी सन 2020-21 या आर्थिक वर्षाची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने मासिक सभेत घेतले असल्याची माहिती उपसरपंच सुजित म्हात्रे,ग्रामपंचायत सदस्य रितेश ठाकूर यांनी दिली.दरम्यान उपसरपंच सुजित म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य रितेश ठाकूर यांनी घरपट्टी माफ करण्यासाठी पाठपुरावा केला होता.त्यांच्या या मागणीला यश आले असून सर्व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहे. ग्रामपंचायत बांधपाडा मधील घरपट्टी माफ करण्याच्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र कौतुक व स्वागत होत आहे.घरपट्टी माफ करणारी ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.