रोटरी क्लब ऑफ ठाणे यांचा लोकोपयोगी स्तुत्य उपक्रम...

जनदूत टिम    30-Jun-2021
Total Views |

  • कोरोना काळामध्ये लोकसहभागातून २ धरणे बांधली...

कल्याण : एकीकडे सारे जग कोरोनाविरूद्ध लढ्यात गुंतलेले असताना सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा वेळी रोटरीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने टिटवाळ्याजवळ दोन बंधारे बांधून अंखर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील म्हस्कळ गावात ही योजना राबवली आणि गावकर्‍यांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवला. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनने इंग्लंडमधील वॉलसॉल रोटरी क्लबच्या सहाय्याने हा बंधारे प्रकल्प राबवला.
 
rotary_1  H x W
 
यामुळे सुमारे एक कोटी लिटर पाणी अडवले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील भूगर्भ पाण्याची पातळी वाढणार आहे. जमिनीत पाणी झिरपल्यामुळे गावकर्‍यांना भाजीपाला लागवड करण्यास हातभार लागणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या पावसात ही धरणे वाहू लागली होती.
 
अलिकडेच या दोन धरणांचे ऑफलाईन उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल डॉ. संदीप कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्पासाठी पुढाकार घेणारे रोटेरियन संतोष भिडे, माजी अध्यक्ष राजेंद्र झेंडे, विद्यमान अध्यक्ष संजय जोगळेकर, मिडटाऊनचे संस्थापक-सदस्य ज्येष्ठ पत्रकार मिलिन्द बल्लाळ आदी उपस्थित होते.
 
म्हस्कळ गावातील रहिवाशांनी या योजनेचे स्वागत केले असून रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि कल्याण रिव्हरसाईड क्लबचे आभार मानले आहेत. रोटरी क्लब ऑफ वॉलसॉलचे अध्यक्ष आणि मूळचे ठाणेकर असणार डॉ. मुकूंदा चिद्रवार, बिर्ला इस्टेटचे सर्व अधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले,असे बडे यांनी सांगितले.