तोक्ते वादळग्रस्तांना पालघर येथे कोळी महासंघाची मदत

जनदूत टिम    30-Jun-2021
Total Views |

  • पिक विमा योजना मासेमारांना लागू करण्याची गरज : प्रवीण दरेकर

पालघर : शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पिक विमा दिला जातो तसा मासेमारांना त्यांच्या बोटींना विमा योजना लागू झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल पालघर येथील सातपाटी गावांमध्ये झालेल्या मदत वाटप कार्यक्रमात दिले.
 
pavya44_1  H x
 
तोक्ते वादळामध्ये ज्या समाज बांधवांचे पूर्णतः अथवा अक्षत: नुकसान झाले आहे अश्या नौका धारकांना आणि मासेमार बांधवांना कोळी महासंघाच्या वतीने प्रत्येकी १५ हजारांचे धनादेश आणि साहित्य वाटप कार्यक्रम सातपाटी मच्छिमार विकास सोसायटीच्या सभागृहात झाला होता त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित होते.
 
याप्रसंगी कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि आमदार रमेश दादा पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी सरचिटणीस राजहंस टपके, भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष अड चेतन पाटील आदी मान्यवरही उपस्थित होते. मासेमारांच्या सहकारी तत्त्वावर कार्यक्षमपणे कार्य करणाऱ्या संस्था आहेत मात्र सहकारी बँकांच्या मदतीने त्यांना त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज असून किसान क्रेडिट कार्ड व तत्सम योजना त्यांना जिल्हा व राज्य बँकांकडून लागू करण्यात यावी. मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात यावा, शेतकऱ्यांप्रमाणे पिक कर्ज देणे आणि मत्स्य संपदा योजने करिता त्यांना जागृती व अंमलबजावणीसाठी कार्य करण्याची गरज आहे. या चार सूत्राने मासेमार समाजाचे जीवन बदलू शकते अशा संवेदना त्यांनी व्यक्त केल्या.
 
यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांनी आपण कर्तव्यभावनेने आपदग्रस्तांना मदत करीत असून मच्छिमारांना कृषी सवलती मिळण्यासाठी मासेमारी ला कृषीचा दर्जा मिळावा, ओ एन जी सी बाधितांना भरपाईचे धोरण आणि आता पर्यंत झालेल्या नुकसानीचा पॅकेज मागण्यासाठी, त्याचबरोबर वाढवन बंदर रद्द करण्या करिता कोळी महासंघाचे शिष्टमंडळ लवकरच दिल्ली येथे जाऊन निवेदन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी , सरचिटणीस राजहंस टपके, भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष ॲड चेतन पाटील, सातपाटी मच्छिमार विकास सोसायटीचे अध्यक्ष राजन मेहेर आदींनी आपले विचार मांडले.
 
यावेळी कोळी महासंघाचे नेते देवानंद भोइर, अशोक हंबीरे, ठाणे जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयकुमार भाय, मच्छीमार नेते रामदास मेहेर सातपाटी गावचे सरपंच अरविंद पाटील , एडवन मच्छिमार संस्थेचे सदानंद तरे आणि निरनिराळ्या संस्थांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोळी महासंघाचे सचिन पागधरे, धनंजय मेहेर आणि सातपाटी अर्नाळा गावातील निरनिराळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. 
 
आम्ही जव्हार संस्थान चे पूर्वापार आदिवासी नागरी असून आम्ही सर्व कोळी एकच आहोत, आम्हाला अनुसूचित जमाती ची वैधता मिळायलाच पाहिजे त्यासाठी कोळी महासंघ न्यायालयीन लढाई लढण्यास सज्ज झाला असल्याचे कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस यांनी घोषित केल्यावर, राज्यातील कोळी जमात ही एकच असल्याने त्यांचा अनुसूचित जमातीचा दावा योग्यच आहे , या कोळी जमातीच्या मागणीला माझा पाठिंबा असून मी तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी जाहीर पणे सांगितले.
...... ....
वाढवण बंदर हटाव कृती समितीच्या वतीने यावेळी प्रवीण दरेकर यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी,
मासेमारांचा उदरनिर्वाह व अस्तित्व धोक्यात आणू पाहणारा वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्यासाठी मच्छीमारांच्या भावना मी माझ्या वरिष्ठांना पोचविणार असून स्थानिकांना ज्या पमाणे विकास हवा आहे तसाच विकास व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
.....
यावेळी कोळी महासंघाच्या वतीने आमदार निधीतून रमेश दादा पाटील यांनी सातपाटी गावासाठी ऍम्ब्युलन्स खरेदी करण्याकरिता पंधरा लाखांचा निधी मंजूर केल्याचे पत्र दरेकर यांच्या शुभहस्ते ग्रामस्थांना देण्यात आले, त्याचबरोबर दातिवरे गावाला पाण्याची टाकी बांधण्यासाठी 12 लाखांचा निधी, तर एडवण गावाला हातपंप उभारण्यासाठी एक लाख रुपयांचा निधी मंजुरीचे पत्र ग्रामस्थांना देण्यात आले.