पालघर जिल्ह्यात लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा हवी

पारस सहाणे    28-Jun-2021
Total Views |

  • तिसऱ्या लाटेसाठी तयारी आवश्यक

जव्हार : कोरोनाची दुसरी लाट संपत नाही, तोपर्यंत तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी पालघरमधील आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाली नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात मोठे रुग्णालय आणि बालरोग तज्ज्ञांची वानवा आहे. त्यामुळे जिल्ह्याला तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक तडाखा बसण्याची भीती आहे.
 
javhar55_1  H x
 
उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांवर आरोग्याची मदार आहे. नुकतीच नवजात बालकाला कोरोना होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालघर हा मुळातच कुपोषणग्रस्त जिल्हा आहे. कुपोषित बालकांची प्रतिकारशक्तीजन्मजातच कमी असते. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील १३ बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत मेअखेर १४९ अतितीव्र (सॅम) आणि १,६७९ मध्यम कुपोषित (मॅम) बालकांची संख्या आहे. या बालकांना पौष्टिक आणि पूरक आहार, कोरोना मुळे घरपोच दिला जात आहे. त्यावर अंगणवाडी सेविका नियंत्रण ठेवत आहेत; तर गावपाड्यांतील कुपोषित बालकांची, कोरोनाविषयीची माहिती प्रत्येक विकास अधिकारी घेत असल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण भावसार यांनी दिली आहे.
 
तसेच वसई-विरार महापालिका क्षेत्र धरून जिल्ह्यात केवळ ७५ बालरोगतज्ज्ञ आहेत; तर महापालिका क्षेत्र वगळता आठ तालुक्यांमध्ये केवळ ६ बालरोगतज्ज्ञ कार्यरत आहेत. दरम्यान, पालघर जिल्हा स्थापन होऊन ७ वर्षे उलटूनही तालुकास्तरावरचे बालउपचार करणारे आणि सर्व सुविधायुक्त जिल्हा रुग्णालय झालेले नाही.
 
गंभीर रुग्णांवर तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कासा, जव्हार आणि “ टिमाच्या रुग्णालयात ५० बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात दोन व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. विरारच्या बालरोगतज्ज्ञांकडून जिल्ह्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे.
- डॉ. राजेंद्र केळकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्ह्यात केवळ जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता कक्ष असून येथे ४२ खाटा आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयावर मोठी जबाबदारी येणार आहे. नवजात शिशु अतिदक्षता कक्षातील चार वॉडपैिकी एक वॉर्ड, कोरोनाबधित मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
- डॉ. रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक, जव्हार उपजिल्हा रुग्णालय
दक्षता
1 टीमा, कासा आणि जव्हारच्या रुग्णालयात लहान मुलांसाठी ५० खाटा राखीव.
पालघर ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन 2 प्लॉट अंतिम टप्प्यात आहे.”
जव्हार, डहाणू येथील ऑक्सिजन प्लांटचे फाऊंडेशन काम सुरू
मोखाड्यात नवजात शिशु अतिदक्षता 4 ‘कक्ष स्थापन करण्यात येणार