ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत आमचा लढा सुरूचं राहणार

जनदूत टिम    27-Jun-2021
Total Views |

  • प्रविण दरेकर यांचा इशारा
  • ठाण्यात भाजपचं आंदोलन, प्रविण दरेकर यांना अटक

ठाणे : महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आणि ओबीसी राजकीय आरक्षण संरक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात भाजपच्यावतीने १ हजार ठिकाणी एकत्र आंदोलन करण्यात आले. मविआ सरकारने आम्हाला अटक केली किंवा आंदोलन करण्यापासून रोखले तरी देखील आमचा हा लढा सुरूचं राहील. जोपर्यंत ओबीसी समाजाचं सन्मानाचं राजकीय आरक्षण परत मिळत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
 
pravin44_1  H x
 
ओबीसी राजकीय आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी राज्यभर भाजपने चक्का जाम व जेलभरो आंदोलन केले. ठाणे येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाणे येथे पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड झाली. यावेळी भाजपाच्या आंदोलकांना व विरोधी पक्ष नेते दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दरेकर म्हणाले, सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला तात्काळ स्थगिती मिळविली नाही तर सरकारला ओबीसी समाजाच्या संतापाला सामोरे जावे लागेल. तसेच भाजपसुद्धा ओबीसीच्या राजकीय हक्कासाठी व न्यायासाठी टोकाचं पाऊल उचलेल असा इशारा दरेकर यांनी दिला.
 
काँग्रेस पक्षाच्यावतीने केंद्रातील भाजप सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहिर केले त्यावर बोलताना दरेकर म्हणाले, महाराष्ट्रात कॉँग्रेसचे स्वबळ किती आहे ते कॅमेरा पाठवून बघावे, आंदोलन करायला दम आणि ताकद लागते. केवळ आंदोलन करत आहोत असे वक्तव्य करून होत नसतं. आज रस्त्यावर ओबीसीचे राजकीय आरक्षण संरक्षण करण्यासाठी १ हजार ठिकाणी भाजपचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्यातील भाजपाच्या आजच्या चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून भाजपची राजकीय ताकद बघावी असा टोलाही दरेकर यांनी कॉँग्रेसला लगावला आहे. यावेळी आंदोलनात आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, संजय वाघुले, नारायण पवार, संजय लेले, डॉ. राजेश मढवी, प्रतिभा मढवी इत्यादि उपस्थित होते.