भिवंडी तालुक्यातील चिंचवली गावातील तरुण-ग्रामस्थांचा एक कौतुकास्पद उपक्रम

जनदूत टिम    20-Jun-2021
Total Views |

  • 12 एकर जागेत केवळ 10 दिवसांत श्रमदान आणि स्वकष्टार्जित जमापुंजीमधील आर्थिक योगदानातून साकारला भव्य तलाव

भिवंडी : मार्च 2020 मध्ये पडलेल्या पहिल्या लॉकडाऊनच्या काळात ‘Stay Home, Stay Safe’ या नियमाचे पालन करत दोन महिने घरातच थांबलेल्या या तरुण-ग्रामस्थांमध्ये घडत असलेल्या विचारविमर्षांतून या तरुणांना जाणवले की, आज जगासमोर कोविड-19 सारखी उद्भवलेल्या भयंकर समस्येमागचे कारण, हे नक्की काय असू शकते ? आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण व व्यापारयुद्धामुळे एकमेकांना शह देण्यासाठी सुरु असलेला बायो-वॉरचा प्रयोग की मानवात शहाणपणा आणण्यासाठी निसर्ग दाखवत असलेला प्रकोप ? या प्रश्नाचे नक्की उत्तर माहिती नाही.
 
bhiw589_1  H x
 
परंतु आपणा सर्वांचा निसर्गाकडे पहाण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस फायदावादीच होत असल्या कारणाने प्रचंड प्रमाणावर पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे एवढं मात्र नक्की. म्हणून एके दिवशी या गावातील काही तरूण गावानजीकच्या जंगलात सहज फिरण्यासाठी गेले असता त्यांना जाणवले की, 15 ते 20 वर्षांपूर्वी या जंगलात आढळणाऱ्या स्थानिक पशू-पक्षी आणि वृक्षांच्या अनेक प्रजातींचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. यासाठी आपापल्या परीने काहीतरी करायला हवे म्हणून प्रथम त्यांनी या भागात पूर्वी आढळणाऱ्या पक्ष्यांबाबत माहिती शोधण्यास सुरुवात केली आणि या बाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये जन जागृती करण्यासाठी या पक्ष्यांची वैशिष्ट्य आणि माहितीचे पोस्टर्स छापून थेट जंगलातील वृक्षांवरच चिकटवले जेणेकरून जे कोणी या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी जातील त्यांना कदाचित ते वाचून हे पक्षी व वृक्ष आपणांस किती उपयोगी आहेत याची जाणीव होईल.
 
या परिसरातील पशु-पक्षी व वृक्षांच्या अनेक प्रजाती कमी होण्याच्या अनेक कारणांपैकी हे ही एक प्रमुख कारण होतं की या पशु-पक्ष्यांना पिण्यासाठी जवळपास कोठेच पाण्याची सोय नाही आहे. 25 ते 30 वर्षांपूर्वी गावाच्या वरच्या बाजूला वन विभागातील 12 एकर जागेत भव्य तलाव होते त्यामुळे गावही पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होते मात्र आज गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही आहे, उन्हाळ्याच्या दिवसांत येथील प्राणी व पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची सोयच नाही. म्हणून येथील काही तरुणांनी ठरविले की, कोणत्याही प्रकारे शासकीय योजना किंवा निधीची वाट पाहत न बसता जर गावातील सर्व तरूण-ग्रामस्थ वर्ग एकत्रित येऊन आपापल्या परीने योगदान देतील तर या तलावाचे पुनर्जीवन होऊ शकते.
 
म्हणून या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात कोविड-19 संदर्भात शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करत काही ठराविक तरुणांनी स्वतःहून श्रमदान आणि स्वकष्टार्जित जमापुंजीमधील आर्थिक योगदान देऊन तलाव निर्माणास सुरुवात केली आणि आश्चर्य ते काय पहाता-पहाता गावातील प्रत्येक घरातील व्यक्तीकडून आपापल्या परीने श्रमदान आणि आर्थिक योगदानाचा ओघ सुरु झाला आणि अवघ्या 10 दिवसात 3 हेक्टर जागेत 10 फुट रुंद आणि 20 ते 22 फुट उंचीचा बांध तलावासाभोवती बांधून एका भव्य तलावाचे निर्माण झाले. यावेळी परिसरातील काही निसर्गप्रेमी उद्योजकांनीही आर्थिक योगदान देऊन या उपक्रमाचे स्वागत केले आहे. या तलावाच्या निर्माणामुळे गाव तर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईलच शिवाय सभोवतालच्या जंगलामध्ये असणाऱ्या पशु-पक्ष्यांसाठी पाण्याचीही सोय होणार आहे. शिवाय गाव आणि जवळील वाड्या वस्तीतील लोकांच्या पिण्याचा पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. त्याचप्रमाणे गावातील काही शेतकरी वर्ग भाजीपाला तसेच बारमाही पिक सुद्धा घेऊ शकणार आहेत.
 
विशेष म्हणजे या उपक्रमामुळे प्रेरित होऊन गावातील सर्व महिला वर्ग या महिन्यात येणाऱ्या वटपौर्णीमेला केवळ वडासभोवती धागा गुंडाळून पूजा न करता तलावासभोवती वड, पिंपळ, चिंच या सारख्या स्थानिक प्रजातीच्या झाडांचे रोपण करून त्यांची पूजा करणार आहेत.