खडवलीच्या भातसा नदीवर पर्यटकांची तुफान गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

जनदूत टिम    15-Jun-2021
Total Views |
कल्याण : कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे तसेच अनेक पर्यटकांचे जीव धोक्यात जाऊ नये म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील धबधबे, झरे, नदीकिनारे, धरण, पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात पर्यटकांना जाण्यास, सेल्फी काढण्यास मनाई आदेश काढले होते. परंतु कल्याण तालुक्यातील खडवली मधील भातसा नदीच्या पात्रात पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे येथे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

nadi44_1  H x W
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ झाली होती. लॉकडाऊन मुळे आता याचे प्रमाण कमी झाले असले तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, शहापूर, मुरबाड या पाच तालुक्यातील धबधबे, झरे, नदीकिनारे, धरण, डॅम, पाण्याचा प्रवाह, डोंगर, दऱ्या आदी ठिकाणी पर्यटकांना जाण्यास, सेल्फी काढण्यास मनाई आदेश लागू केले आहेत. शिवाय ओव्हर टेकींग, बेफिकीर वाहन चालवणे, इतरांना अडथळा निर्माण करणे, स्टंट करणे, इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणे, डीजे लावून अश्लील चाळे करणे, बिभत्स डान्स करणे, आदी ११ मार्गदर्शक तत्वे लागू केले आहेत.
 
कल्याण तालुक्यातील-खडवली, मुरबाड मधील-माळशेज घाट, शहापूर येथील-अशोका धबधबा, अंबरनाथ मधील-डॅम, भिवंडी मधील-वज्रेश्वरी आदी ठिकाणी पर्यटक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यामुळे या पर्यटनस्थळावर अधिक लक्ष द्यावे असे आदेशात म्हटले आहे. तशा स्पष्ट सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. असे असताना आज कल्याण तालुक्यातील खडवली येथील भातसा नदीच्या पात्रात तरुण-तरुणी, लहान मुले यांनी तुफान गर्दी केली होती. सरळ नदीच्या वाहत्या प्रवाहात उतरून पोहत होते. मात्र कुठेही पोलिस अथवा प्रशासनाचे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी दिसत नव्हते.
 
विशेष बाब म्हणजे आतापर्यंत खडवली येथे भातसा नदीच्या प्रवाहात वाहून बुडून मरणाऱ्यांची संख्या शेकडो आहे. तर कित्येकांचे मृतदेह सापडले नाहीत, असे असताना येथील पर्यटकांची संख्या पाहता खरेच या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश लागू पडत नाही का? असा प्रश्न निर्माण होतो. येथे ना जीवरक्षक, ना ग्रामपंचायत कर्मचारी, ना पोलीस, त्यामुळेच अशा बेफिकीर, उडाणटप्पू, टवाळखोर, हुल्लडबाजांची हिंमत वाढते आणि स्वतः सह इतरांचा जीव धोक्यात घालून नाहक त्रास दिला जातो. अशावर कडक कारवाई करायला हवी अशी मागणी जनतेतून होत आहे.