वरंध घाटात कोट्यावधीच्या भिंती उभ्या तरीही दरडींचा धोका कायम

जनदूत टिम    15-Jun-2021
Total Views |

  • जागोजागी दरड आणि भूस्खलनाचा धोका
  • रस्त्यावर पडलेला मलबा, दगडी तशाच ठेवून मार्ग वाहतुकीस खुला

महाड : महाड भोर पुणे मार्गावरील वरंध घाटात नियोजनबद्ध काम होत नसल्याने खराब झालेला रस्ता, पडलेले खड्डे, दरड संभाव्य ठिकाणे यामुळे हा मार्ग ऐन पावसाळ्यात वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. नुकत्याच झालेल्या कामातील माती, दगड तसेच ठेवून हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
 
mahad44_1  H x
 
रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडला जाणारा महाड भोर पुणे हा मार्ग गेली कांही वर्ष भूस्खलन आणि दरडींमुळे सातत्याने बंद पडत आहेत. यामुळे या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र तरी देखील हा घाट मार्ग वाहतुकीस धोकादायकच ठरत आहे. सरंक्षक कठडे, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटर व्यवस्था, आणि इतर आवश्यक बाबी दरवर्षी करणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नित्याचे काम आहे. याकरिता केलेल्या तरतुदीनुसार खर्च केला जातो. आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास किंवा घाटमार्ग बंद पडल्यास वापरली जाणारी यंत्रणा, केला जाणारी पर्यायी व्यवस्था आणि उपाययोजना यावर मात्र विशेष तरतूद करून खर्च केला जातो. मात्र घाटात येणाऱ्या दरडीवर पर्याय म्हणून महाकाय भिंती उभ्या करणे हा सपाटा सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने चालवला आहे. आधीच उभ्या डोंगर भागात तयार केलेल्या या मार्गावर पुन्हा वजनदार भिंती उभ्या करणे भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
 
गेली दोन वर्षापासून वरंध घाटात ज्या ठिकाणी दरडी आणि भूस्खलन झाले होते त्याठिकाणी सिमेंट कॉंक्रीटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. गत वर्षी उभी केलेली भिंत व्ही.जे.टी.आय. इन्स्टिट्यूट कडून रचना करून घेण्यात आलेली होती. जवळपास आठ कोटीची भिंत यावेळी उभी करण्यात आल्याची माहिती तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बी.एन. बहीर यांनी दिली होती. हे काम झाल्यानंतर डांबरीकरण काम केले जाणार होते.
 
यावर्षी देखील अशाच पद्धतीचे काम वरंध घाटात करण्यात आले असून यावेळी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास ६ कोटी रुपये खर्च केले आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करून उभ्या करण्यात आलेल्या भितींच्या कामानंतर रस्त्यात पडलेली माती, दगडे, आणि इतर कचरा तसाच ठेवून रस्ता वाहतुकीस सुरु करण्यात आला. वाघजाई मंदिराच्या अलीकडे अनेक ठिकाणी हा मार्ग खोडून ठेवण्यात आला आहे. अरुंद असलेल्या या घाट मार्गात कायम धुके असल्याने हा मार्ग दुचाकीस्वरांना देखील धोकादायक बनला आहे.
ज्या ठिकाणी भिंती उभ्या केल्या आहेत त्या शेजारील भाग देखील मातीचा असल्याने या पावसात अनेक ठिकाणी माती खाली येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दरडीचा धोका हा कायम असल्याने करोडोच्या भिंती किती ठिकाणी उभ्या करणार असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. माझेरी जवळ गेल्या वर्षी ऐन पावसाळ्यात मोठा परिसर खचला गेला आहे. यामुळे हा मार्ग देखील जवळपास दोन ते तीन ठिकाणी खचला गेला होता. याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण करून खचलेला भाग भरून काढण्यात आला असला तरी या परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसात हा भाग पुन्हा खचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.