देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट

जनदूत टिम    07-May-2021
Total Views |

  • कोविड स्थितीचा आढावा, आदिवासीबहुल भागात लसीकरणाचे आव्हान!

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा सामान्य रूग्णालयाला त्यांनी भेट देऊन आरोग्य अधिकाऱ्यांशी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
 
fas44_1  H x W:
 
दुसऱ्या लाटेत वर्धा, अमरावती, यवतमाळ, नाशिक येथील दौरे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीचा दौरा केला. त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट दिली आणि काही रूग्णांशी सुद्धा संवाद साधला. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोक नेते, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, अन्य लोकप्रतिनिधी-पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक आणि अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कोरोनाची स्थिती आणि उपाययोजना त्यांनी जाणून घेतल्या.
 
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीचा संसर्ग दर हा 20 टक्क्यांच्या वर आहे. प्रारंभीच्या काळात काही समस्या होत्या. पण, आता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. बेड्स आणि ऑक्सिजनची सध्या उपलब्धता आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वांत मोठे आव्हान हे लसीकरणाचे आहे. आदिवासी बांधवांमध्ये गैरसमज पसरविण्याचा काहींचा प्रयत्न. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना काही उपाययोजना सूचविल्या. आमचे लोकप्रतिनिधी सुद्धा यात योगदान देत आहेत. जेथे संभ्रम आहे, तेथे कार्यकर्त्यांनी आधी पुढे यावे, असा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय जनता पार्टी प्रशासनाच्या सोबत यासाठी उभी असेल.
 
गडचिरोली येथे मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव राज्य सरकारने लवकर केंद्र सरकारकडे पाठविला, तर केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करू आणि त्यादृष्टीने गतीने पाऊले पडतील. खा. अशोक नेते यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. वजनदार मंत्र्यांनी केवळ आपल्या जिल्ह्यांचा विचार करू नये, तर संपूर्ण महाराष्ट्र आपला आहे, या भावनेतून काम करावे. हायकोर्टाने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारला विनंती आहे की, महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांचा विचार करावा, त्यातही मागास जिल्ह्यांकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे, अशी मागणी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.