प्राणिमात्रांना कोरोना - नवे संकट

श्याम बसप्पा ठाणेदार    06-May-2021
Total Views |
देशभर कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. देशातील रुग्णांची संख्या दोन कोटींवर गेली आहे. दररोज साडेतीन लाखांहून अधिक लोक कोरोनाने बाधित होत आहेत. कोरोनाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
lion_1  H x W:
 
याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत माणसांनाच हा रोग होत असल्याचा भ्रम आपल्या मनात होता पण आता प्राण्यांनाही कोरोनाची बाधा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जंगलाचा राजा सिंह कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. हैदराबाद मधील नेहरू झुलॉजिकल पार्कमधील ८ आशियाई सिंहाना कोरोनाची लागण झाली आहे. नेहरू झुलॉजीकल पार्क मधील अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या पार्कमधील काही सिंह तापाने फणफणल्या नंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात ८ सिंह कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले अर्थात प्राण्यांना कोरोना होण्याचे हे पहिलेच प्रकरण नाही.
 
गतवर्षीच्या एप्रिल महिन्यात न्यूयॉर्क मधील ब्रॉंक्स झु या प्राणिसंग्रहालयातील एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. आता हैदराबाद मधील प्राणिसंग्रहालयात कोरोनाने शिरकाव केला असल्याने चिंतेत भर पडली आहे. वास्तविक नेहरू झुलॉजिक पार्क मागील काही महिन्यांपासून बंद आहे. नेहरू झुलॉजीकल पार्कच नव्हे तर जगातील सर्वच प्राणिसंग्रहालय कोरोनामुळे बंद आहेत. प्राणिसंग्रहालय बंद असल्याने नागरिकांची ये जा बंद आहे. प्राणिसंग्रहालय बंद असल्याने जनावरांना दररोजचे अन्न पोहचवणे देखील जिकरीचे बनले आहे. वेळेवर अन्न मिळत नसल्याने प्राण्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आता प्राण्यांना कोरोनाने गाठल्याने चिंता वाढली आहे कारण प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी प्राणिसंग्रहालयाला निर्जंतुक करता येऊ शकेल पण गावात मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांवर कसे लक्ष ठेवणार हा प्रश्न आहे.
 
गावात मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांची संख्या खूप असते शिवाय पशुपालन करणाऱ्यांची संख्याही देशात कोट्यावधीच्या घरात आहे. त्यामुळे जर या प्राण्यांना कोरोनाची बाधा होऊ लागली तर देशात नवेच संकट उभे राहिल त्यामुळे प्राण्यांना कोरोनाची बाधा होणार नाही त्यांच्यामार्फत हा संसर्ग पोहचणार नाही याची दक्षता मनुष्यप्राण्याला घ्यावी लागेल. आधीच कोरोनामुळे मनुष्यप्राणी हतबल झाला आहे त्यात जर प्राणिमात्रांची भर पडली तर पृथ्वीवरील जीवसृष्टीच धोक्यात येईल म्हणूनच प्राण्यांपर्यंत संसर्ग न पोचणे यासाठी मनुष्यप्राण्याला अधिक खबरदारी आणि काळजी घेणे गरजेचे आहे.