सामाजिक कार्यासाठी स्वातंत्र्यसैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठान ची स्थापना

जनदूत टिम    31-May-2021
Total Views |
कर्जत : ज्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून निःस्वार्थी भावनेतून परक्या ब्रिटिश सरकारशी मुकाबला केला, अशा क्रांतीविराच्या स्मूती जपणे हे आद्य कर्तव्य मानून अनेक सेवाभावी संस्था आणि तरुण कार्यकर्ते कार्यरत आहेत, देशभक्ती आणि राष्ट्रहित लक्षात घेऊन अनेक उपक्रम राबवून क्रांतीविराच्या आठवणी जतन केल्या जात आहेत, याच पार्श्वभूमीवर स्वातंत्रसैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठान या संस्थेची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे.
 
hiraji44_1  H x
 
कर्जत तालुक्यातील मानिवली येथील गोमाजी पाटील यांनी भाई कोतवाल यांच्या आझाद दस्त्यात सहभागी होऊन क्रांतीचे रणशिंग फुंकले , गोमाजी पाटील यांचा एकुलता एक पुत्र हिराजी सुद्धा ह्या लढयात होता, गोमाजी पाटील यांनी लढ्यात सहभागी होण्या आधी भाई कोतवाल , भाऊसाहेब राऊत , बाबा साहेब ठोसर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करून मोलाचे योगदान दिले होते , एवढे मोठे योगदान असूनही गोमाजी पाटील स्वातंत्रानंतरही उपेक्षित राहिले, त्यांच्या देशभक्तीची आणि त्यागाची दखल कुणीही घेतली नाही, १९६१ साली दुर्धर आजाराने वार्धक्यात त्यांचे निधन झाले.
 
क्रांतिवीर गोमाजी यांच्या कार्याच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या मानस नातसून अनुसया बाई गोपाळ जामघरे यांच्या मार्गदर्शना खाली स्वातंत्रसैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेची स्थापना गोमाजी पाटील यांचे पणतू कल्पेश एकनाथ भोईर यांनी केली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या घटकात कार्य करण्याच्या उद्दिष्टेने स्थापन झालेल्या या संस्थेचे अध्यक्ष कल्पेश भोईर असून सचिव म्हणून इतिहास संशोधक गिरीश कंटे हे काम पाहणार आहेत. ह्या खेरीज सौ, शैला भोईर , अनिश पाटील, एकनाथ भोईर, समाधान गवळी, वृषाली भोईर, शर्मिला गायकर आणि उर्मिला पाटील हे सदस्य प्रतिष्ठानचे शिलेदार आहेत.